Kirit Somaiya : नोएडात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला ट्वीन टॉवर उद्धवस्त करण्यात आला. मात्र, मुंबईतील बेकायदेशीर इमारती, मजल्यांवर कारवाईचे काय करणार असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र दिले आहे. या प्रकरणी कोणत्या बिल्डरला माफी देण्यात येऊ नये अशी मागणीही सोमय्यांनी केली. 


किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबई आणि परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित केले. 25 हजारहून अधिक भाडेकरू, घरमालक घरांना ओसी प्रमाणपत्र नसल्याने चिंतेत आहेत. अनेक टॉवर्सलादेखील ओसी प्रमाणपत्र नाही. काही मजले बेकायदेशीरपणे उभारण्यात आले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी 25 हजारांहून अधिक सदनिकाधारकांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. 


अनिल परबांचा रिसॉर्टही 12 सेकंदात तोडावा


अनिल परब यांच्या मालकीचा रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया अंतिम करण्यासाठी आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली असल्याचे सोमय्यांनी सांगितले. तोडकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले. गणेशोत्सवा दरम्यान कंत्राटदार नेमण्यात येणार असून  दिवाळीपर्यंत अनिल परबांचा रिसॉर्ट तुटणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. नोएडातील ट्वीन टॉवर 12 सेकंदात पाडण्यात आले. अगदी तशाच प्रकारे अनिल परब यांचं हे रिसॉर्टदेखील 12 सेकंदात उद्धवस्त झाले पाहिजे. यामुळे भ्रष्ट मंत्र्यांना एक धडा असेल असेही सोमय्यांनी म्हटले.


किशोरी पेडणेकरांना इशारा


किरीट सोमय्या यांनी यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर आरोप केला. किशोरी पेडणेकर यांनी जवळपास सहा बेनामी गाळे घेतले आहेत. त्याबाबत पुन्हा एकदा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले. किशोरी पेडणेकर यांनी वरळीत बेनामी गाळे खरेदी केले असल्याचे सोमय्यांनी सांगितले.


मुंबई पोलिसांनी माफी मागितली, सत्याचा विजय


किरीट सोमय्या यांनी म्हटले की,  हसन मुश्रीफ यांचा घोटाळा काढण्यासाठी कोल्हापूरला जात असताना त्यावेळच्या गृहमंत्र्यांनी मला अडवण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या प्रकाराविरोधात मी कोर्टात गेलो. त्यानंतर मुंबई पोलिसांनी जी वागणूक दिली त्याबद्दल मुंबई पोलिसांनी माझी माफी मागितली असून सत्याचा विजय झाला असल्याचे सोमय्यांनी सांगितले.


इतर महत्त्वाची बातमी