Devendra Fadnavis : मुंबई महापालिका निवडणुकीचे रणसिंग भाजपच्या वतीने फुंकण्यात आलं आहे भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या सर्वच नेत्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली आणि आपला अजेंडा स्पष्ट केला. खऱ्या शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे. मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची पुन्हा एकदा वर्णी लागली त्यानंतर आज मुंबई भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत षणमुखानंद सभागृहात आशिष शेलार यांचा सत्कार आयोजित केला. निमित्त सत्कार सोहळ्याचा असलं तरीही भाजपचा अजेंडा सेट होता आणि भाजपच्या सर्वच नेत्यांच्या निशान्यावर अर्थातच उद्धव ठाकरे होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. मी अमिताभ बच्चन नाही अमजद खान आहे. साठमधून 40 गेले. तुम्ही सोनिया गांधी समोर झुकलात, असे वक्तव्य केले.  देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली तर आशिष शेलार यांनी सर्व नेत्यांना एकत्र येऊन मुंबई जिंकायचे आव्हान केलं. 


उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र - 
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? त्यानंतर ते म्हणाले की, "तीच संस्कृती, तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच परंपरा... पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सर्वांनी पाहिलं." तसेच, काल दहीहंडी जोरात साजरी झाली. त्याचप्रमाणेच पुढील सणही जोरात साजरे करायचे आहेत.  यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत." 


मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचाच महापौर -
गेल्यावेळीही त्यांनी अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई महापालिकेत आपण मारली. त्यावेळीही महापौर आपण बनवू शकलो असतो, आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण निर्णय घेतला आणि आपण दोन पावलं मागे गेलो. त्यांना महापौर बनवू दिला. पण आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचाच महापौर बनेल, भगवा लागेल. पण कोणती शिवसेना, तर माननिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिंदेंच्या नेतृत्त्वातील खरी शिवसेना.", असं देवेंद्र फडणवीस फडणवीस म्हणाले.


गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना सत्तेत आहे. यंदा काहीही करून शिवसेनेच्या ताब्यातील महापालिका भाजपला जिंकायची आहे. त्यामुळेच भाजपने आशिष शेलार यांच्या खांद्यावर धुरा दिली. शेलार यांनी मोहिमेची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्लातील वरळी येथे दहीहंडी आयोजित करून केली.  येत्या तीन ते चार महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे भाजपने प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप मुंबईकराना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहे. आशा कार्यक्रमातून खरंच मुंबईकर भाजपची साथ देतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.