मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी भूषण धर्माधिकारी यांच्याच नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार केंद्रीय विधी व न्यायमंत्रालयानं बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. 24 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या कोलीजिअम म्हणजेच न्यायवृंदाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.


न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची 23 फेब्रुवारीलाच मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे 24 तासाच्या आतच त्यांनाच या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनवण्यासाठीची शिफारस करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजिअमनं घेतला होता.


मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून प्रदीप नंदराजोग हे सेवानिवृत्त होण्याआधीच त्यांच्या खालोखाल मुंबई उच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ असलेले सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपल्या सेवेतील दोन वर्ष शिल्लक असताना तडाफडकी राजानीमा दिल्यानंतर त्यांचेच ज्येष्ठ चुलत बंधू न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची सेवा ज्येष्ठतेनुसार यापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


मूळचे नागपूरचे असलेले न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी नागपूर विद्यापीठातून बी.एस.सी. (जीवशास्त्र), अतिरिक्त बी. ए. इंग्रजी साहित्यात आणि एल.एल.बी. बी.एस्सीचे शिक्षण घेतले आहे. 1980 साली विधी शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपुरातच कायद्याचा सराव सुरू केला. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये अॅड. वाई. एस. धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ काम केले. पुढे 2004 साली हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून तर 2006 साली न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र 27 एप्रिल रोजी न्यायमर्ती भूषण धर्माधिकारी हे सेवानिवृत्त होत आहेत. आणि अश्यातच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्ट केवळ दोनच तास कार्यरत ठेवण्याचा निर्णयही त्यांच्याच आदेशांनुसार जारी करण्यात आला आहे.