Bhiwandi News:  भिवंडीमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण  पुलावरून  जाणाऱ्या  दुचाकीस्वाराच्या गळ्यात उडत्या पतंगाच्या मांजा अडकून त्याचा गळा कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय हजारे (वय 47, रा. उल्हासनगर ) असे   मांज्यामुळे अचानक गळा कापल्याने मृत्यू झालेल्या  दुचाकीस्वाराचे नाव आहे. 


मृतक संजय हे उल्हासनगर मधील तीन नंबर भागात कुटूंबासह राहत होते. आज मकरसंक्रातीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास भिवंडीतून काम आटपून ते घराच्या दिशने भिवंडीतील  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण  पुलावरून दुचाकीने निघाले होते. याच दरम्यान एका उडत्या पतंगाच्या मांजा अचानक त्यांच्या गळ्याला लागून त्यांचा गळा कापल्यानंतर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला. घटनेची माहिती भिवंडी पोलीस पथकाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत संजय यांचा मुत्यूदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून घटनेचा तपास सुरू केला आहे.


चायना मांज्यावर बंदी असतानासुद्धा पतंग उडवण्यासाठी चायना मांज्याचा वापर


खळबळजनक बाब म्हणजे पतंग मांजा मानेला अडकताच  त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली. तर दुसरीकडे या चायना मांज्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे चायना मांज्यावर बंदी असतानासुद्धा पतंग उडवण्यासाठी चायना मांज्याचा वापर होत आल्याचे आजच्या घटनेवरून दिसून आले आहे.दरवर्षी मकरसंक्रात सणाला पतंग उडविण्याची क्रेझ बच्चे कंपनीत असते.


घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री


काही वर्षांपूर्वीपर्यंत पतंग उडवण्यासाठी साध्या, सुती दोऱ्याचा वापर केला जात होता. मात्र, हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धांमध्ये विरोधकांचा पतंग कापण्यासाठी, आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चीनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो. या दोऱ्यात एकादा पक्षी अकडल्यास त्याची सुटका सहजासहजी  होत नाही. पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी  गरज असल्याचे दिसून येत आहे.


जिल्ह्यात विविध शहरात  पंतगांच्या विक्रेत्यांकडे जात स्थानिक पालिका कर्मचाऱ्यांनी मांजाची तपासणी करुन नॉयलॉन मांजाबाबत शहानिशा  करावी अशी मागणी होत आहे. तर  यापूर्वी कल्याण, भिवंडी, उल्हासनगर शहरातील मांजा   विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाले. तरी देखील मांजामुळे अश्या अपघाताच्या घटना घडतच असल्याने  मांजा विक्रेत्याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ही बातमी देखील वाचा


खतरनाक मांज्यापासून वाचण्यासाठी अनोखा उपाय शोधला; अहमदनगरच्या राष्ट्रपती पदकविजेत्या शिक्षकानं बनवलं वज्रकवच!