मुंबई : मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवरील 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा  झाला आहे. म्हाडाकडून (MHADA) राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज याबाबतची घोषणा केल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. पियुष गोयल यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. 






मुंबईत एनटीसीच्या 11 गिरण्या आहेत. या गिरण्यांच्या जागांवरील चाळींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मुंबई महापालिकेने या चाळींना धोकादायक जाहीर केले आहे. परंतु, या चाळींच्या पुनर्विकासाचे कोणतेही धोरण नसल्याने पुनर्विकास रखडला होता. परंतु, आता म्हाडातर्फे या चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.  


या चाळींचा पुनर्विकास आधीच होणे अपेक्षित होते. मात्र जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असलेल्याने केंद्र सरकारने त्याबाबत राज्य शासनला परवानगी देणे आवश्यक होते. त्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांनी याबाबत निवेद देखील दिले होते, अशी माहिती त्यांनी दिली. 


एनटीसीच्या जागेवरील या चाळींपैकी काही चाळींची जागा मिलमध्येच होती. त्यामुळे त्यांची सीमा निश्चित करणे आवश्यक होते. तर यातील काही चाळी या उपकार प्राप्त नाहीत. त्यामुळे या सगळ्या इमारतीच्या पुनर्विकासात अनेक अडचणी होत्या. आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन या चाळींच्या पुनर्विकासाची योजाना तयार करून सादर करा, केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल असे सांगितले.  त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे या चाळींचा लवकरच पुनर्विकास होणार आहे.


1892 कुटुंबांना दिलासा


या चाळींमध्ये गिरणी कामगारांची जवळपास 1892 कुटुंब आहेत. या कुटुंबांना त्याच जागी हक्काचे घर मिळायला हवे असे तेथील लोकांची मागणी होती. अखेर या नागरिकांच्या मागणीला यश आले आहे.