भिवंडी : तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत करण्यासाठी संसदेत प्रयत्न सुरु असतानाच भिवंडीत एका महिलेला पतीने व्हॉट्सअॅपवरुन ट्रिपल तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

23 वर्षीय तक्रारदार आरजू शेखचा निकाह पाच वर्षांपूर्वी नदीम शेखसोबत झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. पती नदीम शेख टेक्निकल इंजिनीअर म्हणून कल्याणमध्ये काम करतो. आरजू पायाने अपंग असून घरकाम करते.

लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीमला 10,051 रुपये आणि संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरी आरजूचा छळ सुरु झाल्याचा आरोप होत आहे.

मारहाण आणि शिवीगाळ करणारा नदीम तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. मागील काही महिन्यांपासून नदीमने फ्लॅट घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागितला. तो न दिल्यामुळे आपल्याला बेदम मारहाण करुन घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप आरजूने केला आहे.