मुंबई : आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांकडूनच जीवाला धोका असल्याचा आरोप करत 19 वर्षीय प्रियंका शेटे या तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत तळेगाव पोलिसांना मुलीची रितसर तक्रार नोंदवून तिच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. या तरुणीतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी (7 मे) न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली.
पुण्यातील तळेगावानजीक नवलाख उंबरे या गावात राहणाऱ्या प्रियंका शेटे या महाविद्यालयीन तरुणीने स्वतःचा आणि प्रियकराचा जीव वाचवण्याची मागणी करत अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. तरुणीचे दुसऱ्या जातीतील एका युवकावर प्रेम आहे. विराज अवघडे हा मातंग समाजातील असल्याने या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला तिच्या आई-वडिलांचा आणि इतर नातेवाईकांचा विरोध आहे. लग्न केलं तर नातेवाईकांकडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती प्रियंकाने या याचिकेत व्यक्त केली आहे. या प्रकरणी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून प्रियंकाने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे.

VIDEO | अहमदनगरमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती, आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं | एबीपी माझा





"संबंधित तरुण गरीब असला तरी त्याच्याबरोबर मी सुखी राहीन आणि सज्ञान असल्याने मला कोणाबरोबर राहायचे याचा निर्णय घेण्याचाअधिकार आहे," असं या याचिकेतून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आई-वडिल आणि अन्य नातेवाईकांकडून संरक्षण मिळावे, आणि मनाप्रमाणे जगण्याचा मूलभूत अधिकार मिळावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच तिला घरामध्ये डांबून ठेवणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.