टिटवाळा : ठाणे जिल्ह्यातील अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या आयुष्याती एक अजब असा योगायोग समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे तब्बल 37 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला टिटवाळा पोलिसांनी अटक कोली असून या आरोपीचं वयही 37 वर्ष इतकचं आहे. एका गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजसह खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल दिवाकर असं या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून वाशिंद, भिवंडी परिसरातील चोरी केलेल्या 6 मोटर सायकलही हस्तगत केल्या आहेत.


काही दिवसापूर्वी टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरी झाली होती. याच गुन्ह्याचा टिटवाळा पोलीसांच्या पथकाने तपास सुरु केला असता संबधित चोरटा एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. मात्र फुटेज अस्पष्ट होते. हे सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीमार्फत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. ज्यानंतर संबधित व्यक्ती हा सराईत गुन्हेगार सोहेल दिवाकर असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी सोहेलचा शोध सुरू केला. मात्र सोहेल आपली राहण्याची ठिकाणं बदलत होता अखेर तो मीरा रोड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मीरा रोड येथे सापळा रचत सोहेलला बेड्या ठोकल्या.


जामिनावर सुटून पुन्हा चोरी सुरु


पोलीस चौकशी दरम्यान सोहेलने टिटवाळा जवळील परिसरात एक घर भाड्याने घेतले होते. या घरात त्याने चोरी केलेल्या 6 गाड्याही लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि 6 दुचाक्या आतापर्यत  हस्तगत केल्या आहेत. सोहेलने 37 चोऱ्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याच्याविरोधात भिवंडीतील पडघा, गणेशपुरी, आणि भिवंडी शहर अशा केवळ भिवंडी तालुक्यात 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर शहापूर, वाडा, वाशिंद आणि जव्हार याठिकाणीही काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. सोहेलला याआधी अटक झाली होती पण जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha