नांदेड : नांदेड जिल्ह्यातून उस्मानाबाद, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात अमली पदार्थांचा पुरवठा होतो या विषयी NCB मुंबई ने संशय व्यक्त केला होता. आंध्रप्रदेशातून येणारे अमली पदार्थ नांदेडमधून मराठवाडा व राज्यभर व मध्यप्रदेश, कर्नाटक या इतर राज्यातही जात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर मध्यप्रदेशात NCB पथकाची मोठी कारवाई झाली होती.


काही दिवसापूर्वी मांजरम येथे एक हजार 127 किलो वजनाचा आणि तब्बल 11 कोटींचा गांजा NCB ने छापेमारी करत ताब्यात घेतला होता. त्या घटनेच्या दोन ते तीन दिवसानंतर नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील तीन ड्रग्स कारखान्यावर धाड टाकत 111 किलो वजनाची अफूची बोंडे व डोडा भुकटी पावडर मुंबई NCB च्या पथकाने जप्त केली होते. सदर कारखान्यात दोन ग्राइंडर मशीन, अफूचा साठ्या सहित तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान अफू अथवा डोडा भुकटी अमली पदार्थ कारखान्याचा पर्दाफाश करत व मुद्देमाल जप्त करत NCB ने ह्या कारखान्यास सील ठोकले होते. नांदेड शहरा लगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या एका हॉटेल पाठीमागे हा ड्रग्स  कारखाना चालत होता. या कारखान्यातुन NCB मुंबई च्या या पथकास मोठ्या प्रमाणात पोत्यामध्ये भरलेली अफू व भुकटी पावडर अमली पदार्थ ताब्यात घेऊन सील करण्यात आले होते.


नांदेड व्यतिरिक्त उस्मानाबाद, आंध्रप्रदेश या ठिकाणीही अमली पदार्थांचे मोठे साठे छापेमारी करून हस्तगत करण्यात आले होते. NCB मुंबईच्या चार अधिकारी असणाऱ्या या पथकाने समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वात या अगोदर नायगाव येथील मांजरम येथे मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. आज याच पथकाने नांदेडामध्ये कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेत, अफू व बोंडे भुकटी अमली पदार्थ मिळालेला कारखाना सील केला आहे. 


नांदेड शहरात एवढ्या मोठया प्रमाणात सापडलेल्या या अफूच्या बोंडा पासून हेरॉईन ची निर्मिती केल्या जात होती. नांदेड शहरातील नागरी वस्तीत असणाऱ्या या कारखान्यामधून अमली पदार्थांचा हा गोरखधंदा बिनबोभाट चालू होता. नांदेडमध्ये मिळालेला हा साठा मध्य प्रदेशात जात असल्याचा संशय  NCB मुंबईने व्यक्त केला होता. नांदेड जिल्हा हा तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांना लागणारा सीमावर्ती जिल्हा आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांच्या सीमा या नांदेड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग जातात, ज्याचा फायदा अमली पदार्थ तस्करीसाठी हे तस्कर घेतात. त्याच प्रमाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या इतर राज्यांच्या सीमेवर कोणतीही कसून चौकशी केल्या जात नाही.


त्यामुळे असे अमली पदार्थ इतर राज्यातून नांदेड मार्गे महाराष्ट्रात दाखल होण्यास काही वेळ लागत नाही व अडचण ही येत नाही. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठे पाठवून ते साठे, उस्मानाबाद, जळगाव, मराठवाडा व राज्यातील इतर भागात पाठवणे सहज शक्य झालं आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठे व कारखाने भेटले असताना स्थानिक पोलिसांना या विषयी तसूभरही खबर नसावी या विषयी मात्र आश्चर्य व्यक्त केल्या जातेय. कारण अफू, गांजा, हेरॉईन अमली पदार्थ मोठया प्रमाणात नांदेड जिल्ह्यात सापडतात आणि ही कारवाही स्थानिक पोलीस न करता मुंबईहून NCB पथक कारवाई करतेय या विषयी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जातेय. या विषयी नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


महत्त्वाच्या बातम्या :