मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातील ड्रिम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज कोविड रुग्णालयाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला आहे. भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दिलासा देत रुग्णालयाचे कामकाज पुन्हा सुरु करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी हायकोर्टानं फेटाळून लावली. कारण शेवटी या दुर्घटनेत 11 रूग्णांचा मृत्यू झालाय आणि ही वस्तुस्थिती नाकारता येणार नसल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलं.


भांडूप परिसरातील ड्रिम्स मॉलमध्ये चौथ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या सनराईज कोविड रुग्णालयाला 25 मार्च रोजी रात्री उशीरा आग लागली होती. या आगीत 11 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. त्याप्रकरणी ड्रिम्स मॉलचे मालक आणि सनराईज कोविड रुग्णालयाचे मालक असलेल्या प्रिविलेज हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कारवाईचा बडगा उगारत पालिका प्रशासनाने या रुग्णालयाचे भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) रद्द केली. त्याविरोधात रुग्णालय प्रशासनानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. या रुग्णालयात कोविड रूग्णांसाठी 250 खाटा असून ऑक्सिजन पुरवठा करण्याची सोय असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने कोर्टाला दिली गेली. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पालिकेने रद्द केलेली ओसी आम्हाला परत देऊन ताताडीनं रुग्णालय सुरु करण्याची परनागी द्यावी अशी विनंतीही केली गेली. तसेच ही आग मॉलला पहिल्या मजल्यावर आग लागली होती, ती रुग्णालयात लागलीच नाही. आगीच्या लोळातील धुरामध्ये गुदमरून रुग्णांचा मृत्यू झाल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील आभात पौंडा यांनी कोर्टाला सांगितलं. 


या घटनेनंतर संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून पोलिसांनी ही इमारतही सील केली आहे. तर दुसरीकडे, मॉलचे मालक आणि याचिकाकर्ता कंपनीच्या संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्यावतीनं कोर्टाला देण्यात आली. या दोन्ही बाजू ऐकून घेत शेवटी या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती असल्याचं स्पष्ट करत रुग्णालयाचे कामकाज पुन्हा सुरु करण्याच्या अंतरिम निर्देशाची याचिकाकर्त्यांची मागणी हायकोर्टानं फेटाळून लावत सुनावणी जूनपर्यंत तहकूब केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :