मुंबई : कोरोना हाताळण्याच्या बाबतीत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासमोर आभासी चित्र निर्माण करत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम व्यवस्थितरित्या कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आकडेवारीच्या आधारे कोरोना टेस्टिंग कमी झाले असून तो वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये तथ्य वाटतं नाही. मुळात त्यांनी जी आकडेवारी दिली आहे यावरच आमचा विश्वास नाही अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आभासी चित्र निर्माण करण्यापेक्षा टेस्टिंग वाढवा या दिलेल्या सल्ल्याचा समाचार घेतला.
याबाबत अधिक बोलताना भाई जगताप म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता संवेदनशील राहिले नाहीत. आभासी चित्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. गुजरातच्या हायकोर्टाने त्यांना सूचना केल्या आहेत की महाराष्ट्र राज्याने कोरोना रोखण्यासाठी ज्या पद्धतीने काळजी घेतली आहे. त्या पद्धतीने तुम्ही देखील काळजी घ्यायला हवी. अलीकडच्या काळात फडणवीस यांच वागणं बदललं आहे. नागरिक त्यांना नावं ठेवत आहेत आणि त्यातून वाचण्यासाठी असा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्या आकडेवारी वर आमचा विश्वास नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत होते राज्यात लसीकरण होत नाही परंतु महाराष्ट्र लसीकरणात प्रथम क्रमांकावर आहे. आता हे आभासी आहे का?
देशात सर्वात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्रमध्ये झाली असताना देखील मुख्यमंत्री यांनी याविरोधात चांगलं काम केलं आहे. माझा सवाल आहे फडणवीस तुम्हाला.. का तुम्ही लसीकरण, ऑक्सिजन कमतरता याबाबत बोलत नाहीत. त्यामुळे त्यांनी जो पत्र लिहून आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे तो चुकीचा आहे. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप झाला होता त्यावेळी यांनी केवळ हवाई दौरा केला परंतु केलं काहीच नाही. शेवटी कोल्हापूरच्या नागरिकांनी त्यांना आव्हान केलं होतं की इकडं फिरून दाखवा..ते गेले सुद्धा नाहीत. नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड नाराजीचा सूर आहे, असेही जगताप म्हणाले.
दरम्यान विरोधीपक्ष नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भय नको, पण आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! कोरोना चाचण्या, त्यातही आरटीपीसीआर प्रमाण वाढवा अशी मागणी केली आहे.
कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितले आहे.