मुंबई : राज्यात 1 मे पासून 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या नागरिकांचे लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. आता ही लस मोफत मिळणार की त्यासाठी पैसे मोजावे लागणार यासंदर्भात अजूनतरी निर्णय झालेला नाही. मात्र, याआधीच मुंबई महापालिकेने अजब निर्णय जाहीर केला आहे. 1 मे पासून मुंबईतील 18 ते 45 वर्ष वयोगटातल्यांना लस केवळ खाजगी रुग्णालयांतच मिळणार आहे. म्हणजे सार्वजनिक रुग्णालयात केवळ 45 वर्षांवरील व्यक्तींचेच लसिकरण होणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केलाय.
आता 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना खाजगी रुग्णालयातूनच लस दिली जाणार असल्या कारणानं लसीसाठी या वयोगटाला पैसे मोजावेच लागणार आहे. मात्र, उद्या राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत लस मोफत घेण्याबाबत काही निर्णय होतात का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे. गर्दी टाळण्यासाठी वयोगटानुसार विभाजन केल्याचं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे.
काय आहे पालिकेचा निर्णय?
देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोविड प्रतिबंध लस देण्याची मोहीम शनिवारी 1 मे, 2021 पासून सुरु होणार आहे. मुंबईत कार्यान्वित असलेल्या महानगरपालिकेच्या आणि शासकीय अशा एकूण 63 केंद्रांवर सद्यस्थितीप्रमाणे 45 वर्ष वयावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे.
1 मे, 2021 पासून सुरु होणाऱ्या 18 वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आयुक्त चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.
यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, मुंबईत 18 ते 45 या वयोगटात अंदाजे 90 लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी 2 डोस याप्रमाणे सुमारे 1 कोटी 80 लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे सर्व कळीचे मुद्दे आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत लसीकरण मोहिमेसंदर्भातील निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने महानगरपालिका पुढील कार्यवाही निश्चित करेल. असे असले तरी लसीकरणाची वाढती व्याप्ती पाहता नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत, असे चहल यांनी नमूद केले.
- मुंबईत सध्या 136 लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. त्यात शासन आणि महानगरपालिकेचे मिळून 63 केंद्र आहेत, उर्वरित 73 खासगी रुग्णालयातील केंद्र आहेत. आणखी 26 खासगी रुग्णालयांकडून मान्यतेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील केंद्रांची संख्या आता 99 इतकी होणार आहे.
- दिनांक 1 मे पासून सुरु होणाऱ्या 18 वर्ष वयावरील नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण लक्षात घेता मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांवर 18 ते 45 या वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना लस दिली जाईल.
- मुंबईतील शासकीय 63 लसीकरण केंद्रांवर 45 व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनाच लस देण्यात येईल. 18 ते 45 या वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यारितीने विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अंधेरीमध्ये देखील प्रादेशिक लस भांडार सुरु करण्यात येत आहे. हे लस साठवण केंद्र सुरु झाल्यावर सध्याच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस भांडारातून पूर्व उपनगरांसाठी तर अंधेरीतील केंद्रातून पश्चिम उपनगरांसाठी लस वितरण करण्यात येईल.
- मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 227 लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी सर्व संबंधीत विभागीय सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही सुरु करावी. विभागातील आरोग्य केंद्र (हेल्थपोस्ट) हे प्रमाण मानून संबंधित परिसरातील नागरिकांसाठी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. पुरेशी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. महानगरपालिकेच्या दवाखान्यांसह नजीकच्या खासगी रुग्णालयांना देखील त्या लसीकरण केंद्रांशी संलग्न करावे. जेणेकरुन, लसीकरणाचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यास उपचार करणे सोईचे होईल.
- मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध कंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करुन आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करुन घ्यावे, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
- राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील लस उत्पादक कंपन्यांशी संपर्कात असून मुंबईला प्राधान्याने लससाठा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. लससाठ्याचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत दररोज किमान १ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.