मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री अखिल भारतीय कमिटीनं या नियुक्त्या जाहीर केल्या. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मंजुरी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हा खांदेपालट करण्यात आल्याचं बोललं जात आहे.


मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यावर कोणतीही जबाबदारी पक्षाच्या वतीनं सोपवण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी हा पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरत होता. याआधी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. मात्र मिलिंद देवरा यांनी फारसं चांगलं काम केलं नाही. तसेच काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीही या काळात वाढली होती.


पाहा व्हिडीओ : 'भाई' मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांची संधी हुकली



भाई जगताप मुंबईमधील काँग्रेसचा अनुभवी चेहरा


भाई जगताप मुंबईमधील काँग्रेस पक्षाचा एक अनुभवी चेहरा आहे. मराठा समाजामधून येणारे भाई जगताप यांचा पक्षाला चांगलाच फायदा निवडणुकांमध्ये होऊ शकतो. काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये चरणजीतसिंह सप्रा यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सप्रा अत्यंत मृदूभाषी असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसेच माजी मंत्री नसीम खान यांना प्रचार समिती अध्यक्ष करण्यात आलं असून सुरेश शेट्टी यांना मेनिफेस्टो कमेटीचं अध्यक्ष करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :