मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात सोनिया गांधी यांचा आता लेटर बॉम्ब आला आहे.
आतापर्यंत राज्य पातळीवर काँग्रेसची नाराजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मांडली जात होती. पण यावेळी मात्र महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासाबद्दल मुद्दे उपस्थित केल्याचे सांगितले.
याबाबत खुद्द सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले. या पत्राचा विषय राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी हा हेतू असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यामुळेच हे पत्र आणि दिल्लीतील पत्रकार परिषदेचा हेतू असल्याची चर्च राजकीय वर्तुळात सुरु झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता सोनिया गांधी यांनीच पत्र लिहून सरकार तयार होत असताना बनवलेल्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली. यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत काँग्रेसमध्ये नाराजी आहे हे अप्रत्यक्ष दिसून येत आहे.
राज्य पातळीवर सांगूनही काँग्रेसच्या नाराजीची दखल घेतली घेतली जात नसल्याने आता दिल्लीतील हायकमांडला यात लक्ष घालावे लागले अशी चर्चा आहे.
अगदी नुकतीच काँग्रेसने औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करुन तयारी देखील सुरु केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचा कस लागणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा लेटर बॉम्ब पडला आहे. काँग्रेसच्या या मुद्यांचे निरसन होईल का? महाविकास आघाडीतील समन्वय चांगला होईल की अजून बिघडेल हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण सध्या तरी महाविकास आघाडीत सध्या सगळं आलबेल नाही असं चित्र आहे.
काँग्रेस याआधी कधी व्यक्त केली होती नाराजी?
- नगरपालिकेसाठी विकास निधी मिळत नाही म्हणून कैलास गोरंट्याल यांनी थेट सरकार विरोधात आमदारांनी उपोषण धमकी देत नाराजी व्यक्त केली होती
- अशोक चव्हाण यांनी काँग्रेस महापालिका स्थानिक स्वराज संस्था विकास निधी दिला जात नाही यावरुन उघड थेट टीका केली होती.
- केंद्राने मंजूर केलेले कृषी कायदा लागू करु नये त्याविरोधात कायदे आणावे अशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भूमिका याबाबत महाराष्ट्रात अजून फक्त उपसमिती स्थापन करण्यात आली आहे, ठोस कारवाई नाही.
- नितीन राऊत यांनी वीजबिल बाबत सवलत देण्साची भूमिका घेतली, अर्थ खात्याला आठ वेळा प्रस्ताव पाठवले पण प्रस्ताव मंजूर झाला नाही.
- ओबीसी मंत्रालयाला निधी मिळत नाही यावरुनही काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती
- राज्यातील महत्वाच्या निर्णयात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष नेते असतात काँग्रेसचे मत विचारत घेतले जात नसल्याची खदखद
- काँग्रेस पक्षातील संजय निरुपम, मिलिंद देवरा हे नेते सरकारच्या विरोधात काही भूमिका मांडताना दिसतात.
Congress | महाविकास आघाडीत काँग्रेसची उघड नाराजी? समान किमान कार्यक्रम राबवण्याची काँग्रेसची मागणी