डोंबिवली : राज्यात 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत सगळे व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. यानंतर सरकारी आणि खाजगी कार्यालयही सुरु झाली. पण मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा मात्र फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांसाठी सुरु झाली. त्यामुळे सहाजिकच खाजगी नोकरदारांना रस्ते वाहतूक हा एकमेव पर्याय उरला आणि आणि इथूनच सुरू झाला वाहतूक कोंडीचा नवीन त्रास. डोंबिवली ते शीळफाटा मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे इथले वाहनचालक अक्षरशः त्रासून गेलेत. तर प्रवाशांचा बराच वेळ या वाहतूक कोंडीमुळे प्रवासातच जात आहे.


मुंबई आणि उपनगरात काम करणारे बहुतांशी नोकरदार हे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात वास्तव्याला आहेत. तिथून दररोज मुंबईला जायचं म्हटलं तर शिळफाटा, ठाणे, नवी मुंबई असा प्रवास करत त्यांना मुंबई गाठावी लागते. मात्र या सगळ्यात शीळफाट्याची वाहतूक कोंडी या नोकरदारांची डोकेदुखी ठरलीये. कारण दररोज सकाळी एक ते दीड तास आणि संध्याकाळी एक ते दीड तास इतका वेळ फक्त शीळफाटा ते डोंबिवली इतकंच अंतर पार करायला जातोय. डोंबिवलीच्या मानपाडा आणि काटई नाक्यापासून
वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात होते. ही कोंडी अगदी शीळ फाट्यापर्यंत कायम असते. याचं कारण म्हणजे या महामार्गावर सुरु असलेली रस्त्यांची कामं आणि खड्डे.


पाहा व्हिडीओ : डोंबिवली-शीळफाटा मार्ग बनला ट्रॅफिक जंक्शन, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष



खाजगी नोकरदार वर्ग या दररोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पुरता पिचून गेलाय. आधीच मुंबईपर्यंतचा तीन ते चार तासांचा प्रवास, त्यात शीळफाट्याची वाहतूक कोंडी यामुळे नोकरदारांचे दिवसातले सात ते आठ तास फक्त प्रवासातच जात आहेत. त्यामुळे एक तर वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी किंवा खाजगी नोकरदारांना सुद्धा लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी त्रस्त वाहन चालक करत आहेत.


मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही वाहनचालकांची ही मागणी लावून धरली आहे. दररोज याच परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी सोडवता येत नसेल, तर या नोकरदारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी आणि लवकरात लवकर लोकल सेवा सुरु करावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याबाबत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक सुद्धा घेतली. मात्र तरीही अधिकारी वर्गाकडून अद्याप तरी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीये.


या सगळ्याचं खापर वाहतूक विभागाने मात्र रस्ते विकास महामंडळावरच फोडलं आहे. डोंबिवली ते शिळफाटा दरम्यान रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचं काम सुरु असून याठिकाणी दोन लेनच्या मधली जागा खडी टाकून बुजवण्यात आली, तर एक नवीन लेन तयार होईल आणि त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असं वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांचं मत आहे. मात्र याबाबत रस्ते विकास महामंडळाला सांगून सुद्धा त्यांच्याकडून याची अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी अमित काळे यांनी व्यक्त केली आहे.


आधीच खाजगी नोकरदार वर्गाला कोरोनाच्या संकटात सुद्धा जीव धोक्यात घालून मुंबईला जावं लागतंय. त्यात प्रवासाचे सात ते आठ तास त्यानंतर काम आणि घराची जबाबदारी हे सगळं सांभाळतांना सर्वसामान्य नोकरदार वर्गाला मोठी तारेवरची कसरत करावी लागतेय. त्यामुळे एसी केबिनमध्ये बसून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या अधिकारी वर्गाने सर्वसामान्यांच्या समस्येकडे लवकरात लवकर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा सर्वसामान्यांच्या संतापाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


कौतुकास्पद...! ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आदिवासी मुलांना 'त्यांनी' दिले शिक्षणाचे धडे


काही निर्बंधांसह प्रार्थनास्थळे खुली करण्याचा विचार करावा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना