पुनर्विकास करताना 68 टक्के जमीन ही चाळकऱ्यांच्या घरासाठी असेल. तर केवळ 32 टक्के जमीनची विक्री केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.
पुढील दोन वर्षात मुंबईतील पुनर्विकासाचं एकही काम शिल्लक राहणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. तसंच येत्या दोन वर्षात सर्व पोलिसांना हक्काची घरं देणार असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
बीडीडी चाळींचा इतिहास, वैशिष्ट्ये
पूर्वीच्या सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाला नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
'बीडीडीची जमीन सोन्याचा तुकडा'
मुख्यमंत्री म्हणाले, "बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली याचा मला आनंद आहे. मी विधानभवनात प्रवेश केल्यापासून एक अधिवेशन असं गेलं नाही जिथे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची चर्चा झाली नाही, मात्र काम कधीच झालेलं दिसलं नाही. इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे हे काम कधीच झालं नाही. या जमिनीचा भाग म्हणजे अनेकांसाठी सोन्याचा तुकडा होता. मात्र अनेक लांडगे एकाच भक्षापाठी जातात तेव्हा कोणालाच काही मिळत नाही अशी कथा या बीडीडी चालीची आहे."
हत्ती निघालाय, शेपूट अडकू देणार नाही
याशिवाय "आता हत्ती निघालाय, शेपूट अडकू देणार नाही. आम्ही कोणाच्या अजेंड्यासाठी थांबणार नाही. आमचे उद्दीष्ट स्पष्ट आहे, आमचा अजेंडा लोकहीत आहे. पुढच्या दोन वर्षात मुंबईतल्या पुनर्वसनाचं एकही काम शिल्लक ठेवणार नाही", अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पोलिसांना घरं देणार
"बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना घर द्यावंच लागेल. त्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनीसुद्धा संघर्ष केला आहे. पुढच्या दोन वर्षात सर्व पोलिसांसाठी मालकी हक्काची घर मिळवून देणार. पंतप्रधान आवास योजनेत पोलिसांच्या घरांच्या प्रकल्पाचा समावेश करून घेतला आहे. माझा शब्द आहे हा पुनर्विकास वेळेत पूर्ण करणारच, फक्त तुमची साथ हवी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली.
आता शिव्या द्या, मात्र नंतर आशिर्वादही द्या
घराला रंग जरी लावायचा झाला तरी घरातील सामान बाहेर काढावं लागतं. त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागेल. आम्हाला शिव्या दिल्या तरी चालेल पण काम पूर्ण झाल्यावर आशिर्वादही द्या, असा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.
संबंधित बातम्या
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं आज भूमीपूजन
बीडीडी चाळींचा इतिहास, वैशिष्ट्ये