मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गिरणगावातील 195 बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं भूमीपूजन होत आहे.

1921 ते 1925 या कालावधीत या इमारती बांधण्यात आल्या आहेत. म्हणजेच बीडीडी चाळीने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे अर्थातच बांधकामं जर्जर झालं आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या मागणीने जोर धरला होता.

जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत बीडीडी चाळीत 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्यांना 500 चौरस फुटांची घरं मिळणार आहेत.

डिलाईन रोड, वरळी, नायगाव, शिवडी येथे ब्रिटीशकालीन 207 चाळी आहेत. त्यातील 194 चाळींच्या पुर्नविकासाचं भूमीपूजन आज होणार आहे.

गेली अनेक वर्षे रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीसांनी अवघ्या अडीच वर्षात हिरवा झेंडा दाखवला असला, तरी याला काही संघटनांचा विरोध आहे. त्यामुळं हा विरोध पाहता, आजच्या कार्यक्रमात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बीडीडी चाळींची वैशिष्ट्ये

  • ब्रिटीश डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या जमिनीचे मूळ मालक होते.

  • 95 वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन चाळी 1919 मध्ये बांधण्याचा निर्णय झाला.

  • 1923 पासून गिरण्यांमधील कामगार, रेल्वे कर्मचारी अशा श्रमिकांना या खोल्या भाडेकरू म्हणून राहण्यासाठी देण्यात आल्या.

  • किमान 6 रुपये ते कमाल 8 रुपये भाडे इतकं नाममात्र शुल्क या कामगारांना द्यावे लागत असे.

  • चाळींच्या देखभालीसाठी नंतर बॉम्बे इम्प्रूमेंट ट्रस्टची स्थापना झाली.

  • स्वातंत्र्यानंतर याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली.

  • वरळी, डिलाईल रोड, नायगाव आणि शिवडी या गिरणगावात मिल कामगार, रेल्वे कर्मचारी अशा श्रमिकांचं वास्तव्य असलेल्या चाळी.

  • मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या 92 एकरात 207 बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रस्तावित आहे.

  • 4 मजली चाळीत प्रत्येक मजल्यावर 20 खोल्या अशा प्रत्येक इमारतीत एकूण 80 खोल्या आहेत.

  • 160 चौ. फुटांच्या खोलीत राहणाऱ्या साधारण 13 हजार चाळकऱ्यांना 500 चौ. फुटांची सदनिका मोफत मिळणार आहेत.

  • बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे.

  • विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात आले. डिलाईल रोड आणि नायगाव बीडीडीच्या पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या असून डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम शापूरजी अॅन्ड पालोनजी या कंपनीला तर नायगांव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम एल अॅन्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे.

  • वरळी प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून लवकरच तेथे बांधकाम करणारी ठेकेदार कंपनी जाहीर केली जाईल.

  • डिलाईल रोड येथे चाळकऱ्यांसाठी 23 मजली इमारती बांधण्यात येतील तर विक्रीसाठी 60 मजल्यांच्या इमारती बांधण्याचे प्रस्तावित आहे.

  • चाळकऱ्यांना टप्प्याटप्प्याने संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. डिलाईल रोड आणि नायगाव येथील पुनर्विकासाचा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण होणार आहे.


संबंधित बातमी

मुंबईतील श्रमिकांची कर्मभूमी आता इतिहासजमा होणार