बीएआरसीमध्ये सायंटिफिक असिस्टंट म्हणून इलेक्ट्रिक विभागात काम करणारे नितीन विष्णू शिरवळकर यांच्यावर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास रस्त्यावरील एका झाडाची फांदी कोसळली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना बीएआरसीमधील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होतं, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
गोवंडीत अणुशक्तीनगरमधील बीएआरसीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भली मोठी झाडं आहेत. पावसाळ्यात या झाडांचा मोठा धोका असतो. याबाबत पालिकेने बीएआरसी प्रशासनाला पत्र लिहून या झाडांची काळजी घेण्याबाबत कळवलंही होतं. दुसरीकडे, झाड पडून खासगी जागेवर दुर्घटना झाल्यास, त्याला आपण जबाबदार नसू, असं म्हणत मुंबई महापालिकेने हात झटकले आहेत.
मालाड आणि अंधेरीत बळी
मुंबईत आज एकाच दिवसात झाडं पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याने हा पावसाळ्यात चिंतेचा विषय झाला आहे. मालाडमध्ये नारियलवाला कॉलनीजवळ एसव्ही रोडवर सकाळी अंगावर झाडाची फांदी कोसळून शैलेश राठोड यांचा मृत्यू झाला. तर काल अंधेरी महाकाली केव रोडवर तक्षशीला सोसायटी परिसरात झाड पडून 48 वर्षीय अनिल नामदेव घोसाळकर जखमी झाले होते. मात्र होली स्पिरीट रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला.
वायु चक्रीवादळाचे मुंबईवर परिणाम
चर्चगेटमध्ये होर्डिंग कोसळून 62 वर्षीय मधुकर नार्वेकर यांचा मृत्यू झाला. चर्चगेट स्टेशनबाहेरील महात्मा गांधी यांच्या भव्य चित्राचा भाग जोरदार वाऱ्यामुळे कोसळून त्याखाली अडकल्यामुळे नार्वेकर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर वांद्रे पश्चिम भागातील एसव्ही रोडवर स्कायवॉकच्या पत्र्याची शेड खाली कोसळून दोन महिला जखमी झाल्या.
झाड पडून मृत्यू झालेल्या घटना
* 22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू
* 23 जुलै 2017 - किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू
* 7 डिसेंबर 2017 - शारदा घोडेस्वार - डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू
* 19 एप्रिल 2018 - दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू
* 29 मे 2018 - वाळकेश्वरमध्ये सुखी लीलाजी यांचा अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू
* 24 जून 2018 - मेट्रो सिनेमाजवळ अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू, चार जखमी
* 24 जुलै 2018 - मुलुंडमध्ये रिक्षावर झाडाची फांदी कोसळून प्रवाशाचा मृत्यू
* 14 जून 2019 - मालाडमध्ये झाडाची फांदी कोसळून शैलेश राठोड यांचा मृत्यू
* 14 जून 2019 - अंधेरीमध्ये झाड कोसळून जखमी झालेले 48 वर्षीय ड्रायव्हर अनिल नामदेव घोसाळकर यांचा मृत्यू
* 14 जून 2019 - गोवंडीमध्ये झाड कोसळून 43 वर्षीय बीएआरसी कर्मचारी नितीन विष्णू शिरवळकर यांचा मृत्यू