मुंबई : आपल्याला युतीतच लढायचं आहे, युतीत वाद सुरु असल्याचा प्रचार शरद पवार करत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केलं. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव यांनी महत्त्वाची भूमिका मांडली.

विधानसभेचं जागावाटप आणि मुख्यमंत्रिपद याबाबत माझं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं सुरु आहे. आपल्याला युतीतच लढायचं आहे, युतीत वाद सुरु असल्याचा अपप्रचार जर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या, अशा शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली.

बैठकीत शेतकरी प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा झाली. तुम्ही पीक विमा योजना, शेतकऱ्यांच्या समस्या, जिल्ह्यातील आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसमोर आपली भूमिका मांडली.

VIDEO | विधानसभेच्या जागांबाबत 'आमचं ठरलंय' : उद्धव ठाकरे | एबीपी माझा



राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचं पंचांग अद्याप आपल्यापर्यंत आलं नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांनाही अनभिज्ञ ठेवलं आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे.

येत्या रविवारी म्हणजेच 16 जूनला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र रविवारी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यादिवशी उभ्या देशाचे डोळे टेलिव्हीजन स्क्रीनला खिळलेले असणार. कारण क्रिकेट वर्ल्ड कपमधला भारत विरुद्ध पाकिस्तान हा चुरशीचा सामनाही याच दिवशी आहे. तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री खरंच रविवारचा मुहूर्त साधणार का, हे पहावं लागेल.