मुंबई : भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या डॉ. विजय मल्ल्याला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष (पीएमएलए) न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेली त्याची सुमारे 5646 कोटींची संपत्ती विकून थकीत कर्ज वसूल करण्यास न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी बँकांना परवानगी दिलेली आहे. विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअरलाईन्सनं स्टेट बँक ऑफ इंडियासह विविध बँकांचे तब्बल 9 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज थकवले आणि परदेशात जाऊन आश्रय घेतला आहे.


दरम्यान ईडीनं याप्रकरणी मल्ल्या आणि त्याच्या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या बँकांनी मल्ल्याला कर्ज दिले होते, त्या बँकांनी 5600 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी डीआरटीकडे दाद मागितली होती. त्या बँकांच्या म्हणण्याची गंभीर दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयानं मल्ल्याच्या जप्त केलेल्या संपत्तीपैकी 5600 कोटींची संपत्ती बँकांकडे सोपवण्यास तसेच बँकांना ही संपत्ती विकण्यास मुभा दिली आहे. या निर्णयामुळे मल्ल्याकडील कर्ज वसूली सुरु करण्यासाठी बँकांना मल्ल्याची संपत्ती विकता येणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी नुकताच हा निर्णय दिला आहे. मल्ल्याच्या जप्त केलेल्या संपत्तीवर ईडीने आपला दावा ठेवला होता. ईडीचा हा दावा उठवत पीएमएलए न्यायालयाने बँकांना संपत्ती विक्रीचा मार्ग आता मोकळा करून दिला आहे.


विजय मल्ल्याने देशातील प्रमुख शहरांत आपल्या संपत्तीचे साम्राज्य उभं केलं आहे. त्यापैकी बंगळुरू शहरात असलेली यूबी सिटी कमर्शिअल टॉवरमधील सात मजले, किंगफिशर टॉवरमधील 564 कोटींच्या निर्माणाधिन मालमत्ता, युनायटेड ब्रेवरिज आणि युनायटेड स्पिरिट्समधील शेअर्सची विक्री करण्यास बँकांना परवानगी देण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :