मुंबई : 14 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सी वास्तव्याला होता. याच बेटावरील डोमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 62 वर्षीय फरार मेहुल चोक्सी ॲंटिग्वाच्या नागरिकत्वाच्या आधारे 2017 पासून तिथे लपून बसला होता. आता त्याचं भारताकडे सोपवण्याची तयारी ॲंटिग्वा सरकारने केली. मेहुल चोक्सीला भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील बॅरेक नंबर 12 च्या सेलमध्ये ठेवण्यात येईल. हा सेल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीसाठी तयार केले आहे. नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी काही वेळ लागेल म्हणून या विशेष सेलचा पहिला मानकरी पुतण्याऐवजी काका ठरणार आहे. 


मेहुल चोक्सी हा भारतातील प्रत्यार्पण रोखण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. त्याच्याकडे सध्या अँटिग्वाचं नागरिकत्त्व आहे. मेहुल चोक्सीसमोरचे सर्व पर्याय आता संपत आले आहेत. त्यामुळे त्याचं नागरिकत्व आता रद्द करण्यात येईल, असा इशारा अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी गेल्याच वर्षी दिला होता. यामुळेच मेहुल चोक्सीने ॲंटिग्वा सोडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला चोक्सी क्युबाला गेल्याची माहिती होती. पण इंटरपोलने जारी केलेल्या यलो कॉर्नर नोटीसमुळे डॉमोनिकाच्या सीआयडीने त्याला ताब्यात घेतलं.


एबीपी न्यूजशी बोलताना अँटिग्वा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन म्हणाले की, "चोक्सीला भारतात परत पाठवलं जाईल आणि भारतीय अधिकारी डॉमिनिकामधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत." ब्राऊन पुढे म्हणाले की, "आम्ही डॉमिनिकन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना विनंती केली आहे की त्याला अँटिग्वा परत पाठवू नये, कारण ॲंटिग्वाचा नागरिक म्हणून त्याला कायदेशीर आणि घटनात्मक हक्क आहेत. त्याला थेट भारतात परत पाठवावं, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी अशी विनंती आम्ही त्यांना विशेषत: केली आहे."


"मला खात्री आहे की डॉमिनिका त्याला भारतात पाठवेल. तो डॉमिनिकेचा नागरिक आहे का याबद्दल मला कोणतीही माहिती नाही आणि त्याला कोणत्याही घटनात्मक संरक्षणाचा फायदा मिळेल, असं वाटत नाही. त्या आधारावर डॉमिनिकाला त्यांची हद्दपार करणं सोपं होईल. आम्ही त्याला परत स्वीकारणार नाही. बेट सोडून त्याने एक मोठी चूक केली. डॉमिनिकन सरकार सहकार्य करत आहे आणि आम्ही त्याला भारताकडे परत पाठवावं अशी विनंती केली आणि तशी माहिती आम्ही भारत सरकारलाही दिली आहे," असं गॅस्टन ब्राऊन यांनी सांगितलं.


आपल्यावरील आरोप खोटे, निराधार आणि राजकीय प्रयत्नांमुळे प्रेरित आहेत, चोक्सीने याआधी म्हटलं होतं. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीला अटक केली आहे. काकाप्रमाणेच नीरव मोदीनेही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता आणि सध्या तो युनायटेड किंग्डममध्ये आहे. नीरव मोदी अद्यापही या प्रत्यार्पणाच्या आदेशाला यूके उच्च न्यायालयासमोर आव्हान देऊ शकतो. त्यामुळे पुतण्याच्या आधी काका चोक्सीला भारतात आणलं तर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेलमध्ये राहणार हे निश्चित. 


बॅरेक नंबर 12 मध्ये याधी राहिलेले हायप्रोफाईल व्यक्ती 
यापूर्वी बर्‍याच हाय-प्रोफाईल व्यक्ती बॅरेक क्रमांक 12 मधील पूर्वीचे रहिवासी होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून बॅरेक क्रमांक 12 मध्ये ठेवलं होतं. शीना बोरा हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी, पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्यातील आरोपी एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांचा मुक्काम देखील याच बॅरेकमध्ये होता. यासोबतच 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा दोषी आणि पाकिस्तानी अतिरेकी अजम आमीर कसाबला देखील याच बॅरेकमध्ये ठेवलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :