मुंबई : मुंबईत एका बँक अधिकाऱ्यानेच चक्क बँकेला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युनियन बँकेच्या शिवडी शाखेतील अधिकाऱ्याने बँकेला तीन कोटींचा चुना लावला.


बँकेच्या  क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटचा प्रमुख बरुम मुझुमदारला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.  आरोपी गेल्या सहा वर्षांपासून रे रोड परिसरात असलेल्या युनियन बँकेतील क्रेडिट कार्ड विभागप्रमुख म्हणून कार्यरत होता.

मुझुमदारने स्वत:च्या नावावर बँकेकडून चार क्रेडिट कार्ड घेतले होते. या क्रेडिट कार्डमधून तो काही प्रमाणात खरेदी करायचा, तर काही प्रमाणात पैसे काढायचा. मात्र विभागप्रमुख असल्याचा गैरफायदा घेत त्याने कधीच ही रक्कम परत केली नाही.

पदाचा गैरवापर करत त्याने पैसे जमा केल्याच्या नोंदी ऑनलाईन केल्या होत्या. त्यामुळे त्याला ठराविक महिन्यांमध्ये बँकेकडून अधिक रक्कम काढण्याची मुभा मिळत होती. अशाप्रकारे आरोपीने मार्च 2012 ते जुलै 2018 या कालावधीत बँकेला तीन कोटींचा गंडा घातला.

काही दिवसांपूर्वीच त्याच्या पदावर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्याला बरुमच्या कारनाम्याची माहिती मिळताच त्याने त्याला चौकशीसाठी अनेकदा बोलावलं. मात्र तो चौकशीसाठी येत नसल्याने 13 डिसेंबरला शिवडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.

आरोपीला याची माहिती मिळताच तो फरार झाला होता. अखेर तो पश्चिम बंगालमधील आपल्या मूळ गावी असल्याची माहिती मिळताच शिवडी पोलीसांकडून त्याला अटक करण्यात आली.