मुंबई : पारंपरिक गाणी ही लग्न समारंभ आणि विविध सोहळ्यात सर्रासपणे गायली जातात. त्यामुळे या गाण्यांवर तूर्तास कोणीही हक्क बजावू शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने गीतकार आणि प्रकाशकासह तिघांना गुरुवारी दिलासा दिला. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गीतकार आणि प्रकाशकाविरोधात आरोपपत्र दाखल करु नका, असे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले.
पारंपरिक गाणी गायल्याने कॉपीराईटचा भंग होतो की नाही? ते लवकरच आम्ही ठरवू, असे खडे बोलही राज्य सरकारला यावेळी सुनावले.
लग्न समारंभात पारंपरिक गाणी गायली, तसेच ही गाणी पुस्तकात छापली म्हणून गीतकार प्रमोद सूर्या आणि प्रकाशक पुखराज सूर्या आणि हितेन पटेल या तिघांविरोधात डिसेंबर 2014 मध्ये आशादेवी सोनीगडा यांनी मुंबईतील मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, म्हणून प्रमोद सूर्या, पुखराज सूर्या व हितेन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेत पारंपरिक गाणी गायल्यामुळे कॉपीराईटचा भंग कसा काय होऊ शकतो?, अशा शब्दांत राज्य सरकारला खडसावले.
एवढेच नव्हे तर आपले राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् हे देखील यापुढे कोणीही पुन्हा प्रकाशित करु शकत नाही का? असा सवालही सरकारला केला. जुनी पारंपरिक गाणी नव्याने प्रदर्शित करणे अथवा ती संग्रहित ठेवल्यामुळे कॉपीराईटचे उल्लंघन होते की नाही? याचा आम्ही विचार करु, असे स्पष्ट करत याबाबतची सुनावणी न्यायालयाने तूर्तास तहकूब केली.
पारंपरिक गाण्यावर कॉपीराईट कसा? : हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
03 Jan 2019 10:20 PM (IST)
लग्न समारंभात पारंपरिक गाणी गायल्याबद्दल आणि पुस्तकात छापल्याबद्दल गीतकार प्रमोद सूर्या आणि प्रकाशक पुखराज सूर्या, हितेन पटेल या तिघांविरोधात डिसेंबर 2014 मध्ये आशादेवी सोनीगडा यांनी मालाड पोलिसात तक्रार दाखल केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -