मुंबई : महाराष्ट्रात राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली, विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने केलेल्या प्रचार आणि प्रसाराच परिणामही निवडणुकांच्या निकालात पाहायला मिळाला. आता, अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करुन योजना बंद करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात असतानाच बांग्लादेशी महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin yojana) लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. बांग्लादेशी महिलांनी खरंच या योजनेचा लाभ घेतला आहे का, किती महिलांना योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केलीय, यासंदर्भात मुंबई क्राइम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तपास सुरू आहे. एकीकडे बांग्लादेशी घुसकोरांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून केंद्रीय स्तरावरुनही नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे, पोलिसांकडून बांग्लादेशी नागरिकांची शोधमोहिम सुरू आहे.
मुंबई गुन्हे शाखेकडून कामाठीपुरा परिसरात 5 बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं येथील अटकेच्या घटनेतून उघडकीस आलं आहे. सध्या मुंबईत बेकायदेशीर बांगलादेशींवर कारवाई सुरू असून कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईत 5 बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्या येत असून एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरीच पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, ज्या महिलांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
निलम गोऱ्हेंकडून खंत
समाजकंटक घुसखोरी करत आहेत, इथे आल्यावर आधारकार्ड काढतात. लोकांची अपप्रवृत्ती आहेत, जी चुकीची आहे, असे म्हणत बांग्लादेशी घुसकोरांमध्ये लाडक्या बहिणींचा लाभ घेतलेल्या महिलांसंदर्भात प्रतिक्रिया देताना विधानपरिषद उपसभापति निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
भिवंडीत बांग्लादेशींचा जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की भिवंडी तालुक्यात हजारों बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या मते, महाराष्ट्रात तब्बल दोन लाख रोहिंग्यांनी असे अर्ज सादर केले असून काही दाखल्यांची चौकशी पूर्ण झाली आहे, तर अनेकांची तपासणी अद्याप बाकी आहे. महापोली, पडघा, बोरिवली, आणि खोणी या गावांतील काही ग्रामपंचायतींवर बेकायदेशीर पद्धतीने जन्म प्रमाणपत्रे देण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर पुढील दोन दिवसांत कारवाई केली जाईल, असे सोमय्यांनी ठामपणे सांगितले आहे.
हेही वाचा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा