Sanjay Raut On Balasaheb Thackeray मुंबई: शिवसेनाप्रमुख स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज जन्म दिवस आहे. आज बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाही. त्यांनी आपल्या सर्वांना हिंदू म्हणून आणि अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानाने जगायला शिकवले, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
बाळासाहेबांनी सर्व राजकीय पदं सहकाऱ्यांना दिली. बाळासाहेब ठाकरे स्वत: कधी कुठल्या पदावर आले नाहीत. बाळासाहेबांनी देशाला, समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या. बाळासाहेबांनी शिवसेनेत गट कधी तयार केला नाही. मार्केटमध्ये ब्रॅंडच्या काही ड्यूप्लिकेट गोष्टी येतात, अशी टीकाही संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केली.
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवं- संजय राऊत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे माहितीच नाही. प्रतिकूल परिस्थित सामना करून उभं राहण्याच काम आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं. हातामध्ये कुठलीही सत्ता नसतांना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला. या देशात हिंदुत्वाच्या नावाने जे ढोंग सुरू आहे, माझं त्यांना आवाहन आहे, ही ढोंग बंद करा, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा. त्यांना अजून दिला नाहीय. स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील भारतरत्न दिलेलं नाहीय, असं संजय राऊत म्हणाले.
आज पुन्हा एकदा दोन शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळणार-
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं आज पुन्हा एकदा दोन शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळतील. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या वतीनं आज अंधेरीत महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहेत.. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचवेळी मुंबईतल्या बीकेसी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा होणार आहे. एकनाथ शिंंदेंच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचं आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं सेलिब्रेशन करण्यात येईल. राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या भाषणात काय घोषणा करतात, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.