Mumbai Crime News: मुंबई : गेल्या वर्षभरापासून भारतात अवैधरित्या राहणाऱ्या एका बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकाला काळाचौकी पोलिसांनी (Mumbai Crime) अटक केलीय. या आरोपीचा तपास एटीएसच्या वतीनं सुरू होता. या तपासादरम्यान त्यानं आपण बांगलादेशातील रहिवासी असल्याचं मान्य केलं होतं. शहादत शेख असं या बांगलादेशी आरोपीचं नाव आहे. मात्र या आरोपीनं स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्यानं चक्क पोलिसांना गुंगारा देत कोठडीतून पळ काढला आहे. या धक्कादायक घटनेमुळे एटीएस पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे. या प्रकरणी  काळाचौकी पोलीस पुढील तपास करत असून आरोपी शहादत शेख याचा शोध घेत आहेत. 


भारतात अवैधरीत्या वास्तव्य


भारतात अवैधरीत्या बांगलादेशातील नागरिक (Bangladeshi Citizen) घुसखोरी करत असल्याच्या घटना आपण कायम  ऐकत अथवा वाचत असतो. भारतात नोकरीच्या किंवा अन्य कुठल्याही कारणानं हे बांगलादेशी भारतात अवैधरित्या घुसखोरी करतात. पोलीस अशा घुसखोरांकडे कटाक्षानं लक्ष ठेवून असतात. मात्र अनेक छुप्या मार्गानं हे घुसखोर भारतात ये-जा करत असतात. शिवाय या बांगलादेशींची ओळख पटणं हे देखील मोठं आव्हान पोलिसांपुढे असते. असाच एक शहादत शेख नामक बांगलादेशी नागरिक गेल्या काही काळांपासून भारतात अवैधरित्या वास्तव्यास होता. मात्र मोठ्या शिताफीनं पकडलेल्या या आरोपीनं चौकशी दरम्यान आपण बांगलादेशी असल्याचं देखील मान्य केलं होतं. या प्रकरणातील पुढील तापस मुंबई पोलिसांनी एटीएसच्या हाती सुपूर्द केला होता. परिणामी शहादत शेख याची रवानगी एटीएस कोठडीत करण्यात आली आहे. त्याकडून आणखी काय नवी माहिती मिळते याबाबत एटीएसच्या वतीनं कसून तपास सुरू होता. या दरम्यान पोलिसांच्या तावडीतून स्वतःची कशी सुटका करून घ्यावी, असा मनसुबा तो गेल्या काही दिवसांपासून आखत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे.


चक्क ATS च्या कोठडीतून पलायन


पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याच्या विचारात असलेल्या शहादत शेखनं एक दिवस एटीएसच्या पोलिसांसमोर स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा केला. बराच वेळ होऊन शहादत परतला नसल्यानं पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर तो स्वच्छतागृहात नसल्याचं समजून आलं. सदर प्रकरणात आणखी तपास केला असता शहादत शेख चक्क स्वच्छतागृहाची खिडकी तोडून, उडी मारुन तिथून पसार होण्यात यशस्वी झाला असल्याचं उघड झालं. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच एटीएस पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे. सदर घटनेप्रकरणी काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शहादत शेख याचा शोध घेत पुढील तपास करत आहे.