मुंबई: वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे पावणेतीन वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. वांद्रे ते गोरखपूर अंतोदय एक्सप्रेस ट्रेन पकडण्यासाठी स्थानकात तब्बल 2500 प्रवासी जमले होते. या एक्स्प्रेस ट्रेनचे सर्व 22 डबे अनारक्षित होते. त्यामुळे दिवाळी आणि छटपूजेच्या सणासाठी  उत्तर भारतात आपल्या गावी निघालेल्या प्रवाशांना ही ट्रेन कोणत्याही परिस्थितीत पकडायची होती. एक्सप्रेस ट्रेनचे काही डबे फलाट क्रमांक 1 वर येताच काही प्रवाशांनी हातात सामान घेऊन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे काही प्रवाशांचा तोल जाऊन ते खाली पडले. मात्र, तरीही गर्दीतील अन्य लोक या पडलेल्या लोकांची पर्वा न करता ट्रेनमध्ये चढू पाहत होते आणि इथूनच चेंगराचेंगरीला (Bandra Terminus Stampede) सुरुवात झाली. 


या दुर्घटनेत परमेश्वर गुप्ता हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाली तेव्हा परमेश्वर गुप्ता यांचा भाऊही त्यांच्यासोबत होता. तो सहीसलामत बचावला. त्याने वांद्रे टर्मिनसवर (Bandra) घडलेल्या दुर्घटनेची 'आँखो देखी' कहाणी सांगितली. अंतोदय एक्सप्रेस फलाटावर आली तेव्हा खूप गर्दी होती. ही ट्रेन पकडण्यासाठी गर्दीचा लोंढा पुढे सरसावला आणि चेंगराचेंगरी सुरु झाली. या नादात खूप लोक ट्रेनखाली केले, अनेकांचे पाय कापले गेले, अनेकजण जखमी झाले, असे परमेश्वर गुप्ता यांच्या भावाने सांगितले.


माझ्या भावाच्या कंबर आणि पायाला दुखापत झाली आहे. काल रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टर अजूनही कागदपत्रांची पूर्तता करत आहे, त्याच्यावर फारसे उपचार झालेले नाहीत. माझ्या भावाचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन बाकी आहे, असे परमेश्वर गुप्ता यांच्या भावाने सांगितले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना भाभा रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठवलेल्या दोन्ही रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर आतापर्यंत तीन रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.


आधीची ट्रेन लेट झाल्याने अपघात घडला?


वांद्रे गोरखपूर या गाडीच्या आधी एक स्पेशल ट्रेन होती. ही एक्सप्रेस ट्रेन 16 तास उशिरा होती. त्यामुळे त्या गाडीची गर्दी अंतोदय एक्सप्रेसला आली. त्यामुळे रेल्वे स्थानकात ताटकळत बसलेल्या प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गाडीत चढायचा, असा चंग बांधून अंतोदय एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातून चेंगराचेंगरी झाली, असे लोहमार्ग उपायुक्त मनोज पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले आहे. या घटनेच्या नंतर आता परिस्थिती नियंत्रणात असून लोकांनी अश्या वेळी घाई करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


आणखी वाचा


प्लॅटफॉर्म नंबर एक, 2500 लोक, भर रात्री वांद्र्यात रक्ताचा सडा; पावणेतीनच्या चेंगराचेंगरीची इनसाईड स्टोरी!