मुंबई: वांद्रे स्टेशनच्या पूर्वेकडील बेहरामपाडा झोपडपट्टीत आग लावणारा मास्टरमाईंड सापडला आहे. निर्मलनगर पोलिसांनी शब्बीर खान या 29 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे अटक केलेला आरोपी आणि त्याचे साथीदार हे आझाद मैदान हिंसाचारातील आरोपी आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची गुरुवारी दुपारी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु होती. त्याचवेळी साडे तीनच्या सुमारास झोपड्यांना आग लागली होती. या आगीत शेकडो झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या.

अतिक्रमण कारवाईवेळी अनेकवेळा आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे ही आगही लागली की लावली याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते.

अखेर पोलिसांनी अधिक तपास करुन शब्बीर खानला अटक केली.

शब्बीर खानने अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी आग लावल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची गुरुवारी दुपारी अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु होती. दुपारी अधिकारी-कर्मचारी जेवायला गेले, त्यावेळी  शब्बीर आणि त्याच्या साथीदारांनी झोपड्यांच्या छतावर रॉकेल ओतलं आणि एका झोपडीतील सिलेंडर उघडून दिलं. त्यामुळे ही झोपडी पेटली आणि त्यापाठोपाठ आगीने पेट घेतल्याने आग भडकली.

सूत्रांच्या मते, शब्बीर हा अवैध झोपड्या बनवून विकण्याचं काम करतो. अतिक्रमण कारवाईवेळी आग लावण्यामागचा त्यांचा हेतूही अजब होता. आगीत झोपड्या वैध असल्याची कागदपत्र जळल्याचं त्यांना भासवायचं होतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा झोपडी बनवता येईल, असा शब्बीर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मानस होता.

आझाद मैदान दंगलीतील आरोपी

दरम्यान शब्बीर खान हा मुंबईत 2012 मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीतील आरोपी आहे. शब्बीरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. शब्बीरसह आग लावणारे 6 आरोपी आहेत ज्यांच्यावर आझाद मैदान दंगलीचा आरोप आहे.  शब्बीरच्या दहा साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
 दरम्यान शब्बीरला पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


आझाद मैदान दंगल काय होती?
11 ऑगस्ट 2012 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर दंगल झाली. म्यानमारमधील मुस्लीम समाजावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीने भेंडी बाजार ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता.


मोर्चेकरांची संख्या कमी असल्याची माहिती होती. त्यामुळे त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र संख्या वाढत गेली आणि परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली. त्यात मोर्चातील जमावातून दगडफेक सुरु झाली. जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना कठीण होऊन बसलं आणि या सर्व प्रकारचं रुपांतर दंगलीत झालं.


या दंगलीत अनेक पोलिस जखमी झाले. शिवाय, सरकारी मालमत्तेसह प्रसारमाध्यमांच्या वाहनांचंही मोठं नुकसान झालं.या दंगलप्रकरणी 63 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र पुढे पुराव्याअभावी पाच जणांची सुटका झाली. शिवाय 45 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला.


आझाद मैदान मोर्चाविरुद्ध मनसेचा मोर्चा



आझाद मैदान दंगलीचा निषेध सर्वच पक्षांनी केला. मात्र राज ठाकरेंच्या नेतृत्त्वा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढत, तत्कालीन पोलिस आयुक्त आरुप पटनायक यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.

त्यानंतर आरुप पटनायक यांची बदली झाली आणि त्यांच्या ठिकाणी म्हणजे मुंबई पोलिस आयुक्तपदी सत्यपाल सिंह यांची वर्णी लागली. त्यावेळीही राज ठाकरेंनी सत्यपाल सिंह यांची भेट घेऊन, आझाद मैदान दंगलीनंतर खालावलेल्या पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी पावलं उचलण्याची विनंती केली होती.



संबंधित बातम्या