Balasahebanchi Shiv Sena Shivir : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) गटाचं एकदिवसीय शिबीर होणार आहे. मुंबईतील (Mumbai) स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथे हे शिबीर पार पडेल. शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर चर्चा होणार का हा याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी निवडणुका आणि रणनीतीबाबत या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी शिंदे गटाचं शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
सण उत्सव असो वा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन, प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या पद्धतीने छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाला काय मार्गदर्शन करायचं, आगामी काळात रणनीती कशी असावी याबाबत शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे शिबिर आयोजित केल्याने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.
बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांचे कान टोचणार?
यासोबतच गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांकडून होत असणारी बेताल वक्तव्ये पक्षाला तसंच शिंदे-फडणवीस सरकारला अडचणीत आणणारी ठरत आहेत. मागील काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार, संतोष बांगर तसंच गुलाबराव पाटील हे वाच्याळ वक्तव्य करताना दिसून आले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दिवसेंदिवस शिंदे सरकारच्या अडचणी वाढत आहे. दुसरीकडे भाजप देखील शिंदे गटातील या वादग्रस्त नेत्यांमुळे नाराज असल्याची चर्चा आहे.या शिबिराला प्रामुख्याने मंत्री, आमदार, प्रवक्ते आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलं आलं आहे. कोणताही मंत्री/आमदार माध्यमांसमोर येऊन बेताल वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे प्रवक्त्यांमध्ये नाराजी आहे. कालच अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन शिंदे गटातील नेत्यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करुन तातडीने सुप्रिया सुळे यांची माफी मागण्यास सांगितलं आहे. त्यामुळे या एकदिवसीय शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांची कानउघडणी करणार असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाच्या शिबिरात काय काय होणार?
- शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर चर्चा होण्याची शक्यता
- आगामी निवडणुकीबाबत शिबिरात चर्चा होण्याची शक्यता
- येत्या काळात पक्षाची रणनीती काय असावी याबाबत चर्चा होऊ शकते.
- बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकीर्दीतील लढे कसे होते यावर चर्चा होणार