Thane News: ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. मात्र या शो बंद करण्यावरून ठाण्यात चांगलाच राडा झाला. आधी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाचा चालू शो बंद पाडला, प्रेक्षकांना घरी जाण्यास सांगितले. मग त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी 2 प्रेक्षकांना मारहाण केली, त्यानंतर मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव एकटे त्याच शोमध्ये आले. त्यांनी पुन्हा शो सुरू केला, राज ठाकरे यांनी आदेश दिल्याने मी आलो असे त्यांनी सांगितले. अविनाश जाधव यांनी नंतर सर्व कार्यकर्त्यांना बोलवले आणि सर्वांना शो बघण्यास सांगितले. पोलीस कार्यकर्त्यांना सोडत नव्हते म्हणून जाधव स्वतः बाहेर आले, पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आत गेले.


चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असल्याचं सांगत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमची इच्छा काय आहे हे त्यांना कळलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेतल्याचं दाखवलंय ते तसं नाही, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासंदर्भात जे दाखवलं ते इतिहासाला धरुन नाही. अक्षय कुमारला आमचा विरोध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया 16 ते 46 वयाच्या दरम्यानच्या होत्या. अक्षय कुमारचं सध्याचं वय काय आहे, तो दाखवू शकणार आहे का? शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात विकृती का दाखवली जात आहे. शिवाजी महाराजांचा आदर बाजीप्रभू देशपांडे करायचे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


अविनाश जाधव यांनी म्हटलं की, थिएटरमध्ये येऊन प्रेक्षकांना मारहाण केली. हे कुठल्या संस्कृतीला धरुन आहे. आम्ही हा सिनेमा बघणार आहोत. जितेंद्र आव्हाड रोज संस्कृतीबद्दल लिहितात. संविधान मानणारे आहात तर मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल जाधव यांनी केला. तो व्यक्ति दारु प्यायलेला होता तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. मागच्या वेळेला बंगल्यात नेऊन एकाला यांनी मारलं होतं, आता प्रेक्षकांना मारलं, यांनी संस्कृतीच्या गोष्टी करु नये, असं म्हणत जाधव यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला. 


जाधव म्हणाले की, विरोध करण्याची प्रक्रिया वेगळी असते. तुम्ही काही दिवसांपूर्वी मंत्री होते, तुम्ही कायदे मोडत आहात. मला अनेक लोकांचे फोन आले. त्यांनी मला इथल्या घटनेबाबत सांगितलं. राज साहेबांनी मला सांगितलं की प्रेक्षकांसोबत उभे राहा, मग मी एकटा आलो, असंही जाधव म्हणाले.