मुंबई : मुंबई म्हणजे धावपळीचं शहर. या धावपळीला अधिक वेगवान बनवतात त्या मुंबईच्या लोकल. या लोकलमध्ये 'मरणाची गर्दी' असते. तुडुंब भरुन धावणाऱ्या या लोकलमधील गर्दीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी 26 वर्षीय निशांत बंगेरा या तरुणाने नामी अभियान सुरु केले आहे.

'MUSE' या संस्थेने दोन-अडीच वर्षांपूर्वी 'बॅग पकड, जगह बना' नावाचं अभियान सुरु केलं. म्युझ म्हणजे विचार करणं. लोकांना समस्यांवर विचार करायला लावून, त्यांना उत्तरादाखल उपाय देणे, हे या संस्थेचे मूळ उद्दिष्ट आहे.

मुंबईतील लोकलमध्ये सकाळी ऑफिसला जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना प्रचंड गर्दी असते. मग त्याला पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा हार्बर रेल्वे असा कोणताही मार्ग अपवाद नाही. त्यामुळे अर्थातच, प्रवाशांच्या जीवाचे हाल होतात. दिवसभर काम करुन थकलेले चाकरमनी संध्याकाळी घरी जाईपर्यंत पार कंटाळून जातात. हा प्रवास आरामदायी व्हावा, या उद्देशाने निशांत बंगेराने या अभियानाची सुरुवात केली आहे.

निशांत बंगेरा

मुंबईत राहणाऱ्यांचा लोकलशी संबंध येतोच. काहीजणांचं आयुष्यच 'लोकलमय' झालेलं असतं. स्वत:ची गाडी असली, तरी कधी ना कधी लोकलशी संबंध येतोच येतो. त्यामुळे लोकलमधील समस्यांपासून कुणीही अनभिज्ञ नाही.

लोकलमध्ये अनेकजणांना सीटवर बसण्यासाठी जागा मिळाल्यानंतरही, ते आपली बॅग लोकलच्या रॅकमध्ये ठेवतात. त्यामुळे खरंतर असे प्रवासी एकाचवेळी दोन जागा अडवत असतात. हेच निशांतने हेरलं आणि त्याने यावर काय करता येईल, असा विचार सुरु केला. त्यातूनच 'बॅग पकड, जगह बना' या अभियानाची सुरुवात झाली.

'बॅग पकड, जगह बना' अभियान नेमकं काय आहे?

'बॅग पकड, जगह बना' हे अभियान म्हणजे फार काही आडवळणाचं नाहीय. अगदी साधंसुधं आहे. ज्यांना लोकलमध्ये गर्दी असूनही बसण्यासाठी सीट मिळाली आहे, अशा प्रवाशांनी आपली बॅग रॅकमध्ये न ठेवता, स्वत:कडेच ठेवावी. म्हणजे मांडीवर ठेवावी. जमल्यास उभ्या असणाऱ्या आणखी एक-दुसऱ्याची बॅगही पकडावी. याचा फायदा असा होईल की, ज्यांना बसण्यासाठी सीट मिळत अशा प्रवाशांना बॅग रॅकमध्ये ठेवता येईल. जेणेकरुन भरगच्च गर्दीत थोडा का होईना, आरामदायी प्रवास करता येईल.

दोनवर्षांपूर्वी निशांत बंगेरा याच्यासह अम्रिता, जॉर्ज, सोहित, हर्निश, श्रेयश या सगळ्यांनी मिळून दोन-अडीच वर्षांपूर्वी हे अभियान सुरु केले. यासाठी या तरुण मंडळीने बॅचेस तयार केले, तसेच जनजागृतीच्या दृष्टीने विविध पर्यायही निवडले. इतकेच नव्हे, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडेही अर्जद्वारे यासंबंधी भूमिका मांडली आहे.



साल 2015 आणि साल 2017 अशा दोनवेळा निशांत आणि त्याच्या टीमने रेल्वे प्रशासनाला भेटून, 'बॅग पकड, जगह बना' अभियानाची संकल्पना मांडली. रेल्वेने अनाऊन्समेंटवेळी या अभियानात सहभागाविषयी सांगावे, अशी या टीमची मागणी होती. मात्र दोन वर्षांपासून रेल्वेने फारसा प्रतिसाद दिला नाही.

आज (9 फेब्रुवारी) रेल्वे प्रशासनाने स्वत:हून निशांत बंगेराशी संपर्क साधून, या अभियानासंबंधी सकारात्मक विचार केला जाईल, असे कळवले आहे. आज एबीपी माझाशी बोलताना निशांत बंगेरा यांनी ही माहिती दिली. आता रेल्वे प्रशासन खऱ्या अर्थाने 'बॅग पकड, जगह बना' अभियानाला मूर्त स्वरुप कधी देतं हे पाहणे महत्त्वाचे ठरेलच. मात्र त्याचवेळी रेल्वे प्रवाशांनी स्वत:हून पुढे येत, या अभियानात सहभागी होत, लोकलमध्ये बसायला सीट मिळाल्यावर आपापली बॅग आपल्याजवळ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.

तसेच, लोकलमध्ये भयानक गर्दी असतानाही सीट अडवून पत्ते खेळणाऱ्यांचे मोठे ग्रुप असतात, भजन करणारी मंडळी वाद्यांसह भजन करत बसतात, लोकलच्या दरवाजावर बसणारेही ग्रुप असतात, अशी एकीकडे स्थिती असताना, 'MUSE'च्या माध्यमातून निशांत बंगेरा आणि त्याच्या टीमने 'बॅग पकड, जगह बना'सारखं एक विधायक अभियान सुरु केले आहे. हे नक्कीच कौतुकास्पद पाऊल आहे.