जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, वरणगाव येथील रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून एकही डॉक्टर नसल्याने, सरकारच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण एकनाथ खडसे करणार आहेत.

मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, वरणगाव येथील रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करुन देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला गेला. मात्र तरीही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने आठ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत, असे एकनाथ खडसेंनी सांगितले.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, "मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, वरणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून एकही डॉक्टर उपलब्ध नाही. याबाबत मी पाठपुरावा केल्याने आरोग्यमंत्र्यांकडे चार वेळा बैठक घेण्यात आली. आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य संचालक आणि उपसंचालक यांना मी तीन वर्षात किमान 30 वेळा भेटलो, संपर्क केला. डीपीडीसीत प्रश्न मांडला, पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली. परंतु काहीही फायदा झाला नाही."

एकनाथ खडसे यांनी राज्य आरोग्य संचालकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, "डॉक्टर नसलेल्या रुग्णालयाबाहेर सूचना फलक लावण्यात यावा, जेणेकरुन रुग्णांचे हाल होणार नाहीत. आठ दिवसात जर डॉक्टर उपलब्ध झाले नाही तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करु."