कल्याण : बदलापुरातील सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याचा सूत्रधार श्रीराम समुद्र याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षभरापासून ३ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करुन तो पसार झाला होता.


बदलापूरातील सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याची पाळंमुळं लवकरच बाहेर येण्याची चिन्हं आहेत. कारण या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार श्रीराम समुद्र याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

समुद्र कुटुंब सागर इन्व्हेस्टमेंट नावाने मागील अनेक वर्षांपासून बदलापुरात गुंतवणूक योजना चालवत होतं. या योजनेत व्याज जास्त आणि वेळच्या वेळी मिळत असल्याने अनेकांनी आपली आयुष्यभराची पुंजी यात लावली होती. कुणाचे ५ लाख, कुणाचे १० लाख, तर कुणाचे थेट २५ लाख. इतक्या मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांनी या योजनेत गुंतवणूक केली होती. त्यातही रिटायरमेंटचा पैसा गुंतवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक.

अशाप्रकारे आतापर्यंत ३०६० तक्रारी पोलिसांकडे आल्या असून त्यात १५० कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ही योजना फसल्याने बदलापुरातल्या ज्येष्ठ नागरिक आणि गुंतवणूकदारांवर मोठं आभाळ कोसळलं आहे. त्यात अनेक जण तर रस्त्यावर येणार असल्याने, पुढे काय होणार अशा विवंचनेत आहेत.

बदलापुरात अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही योजना २०१६ पर्यंत व्यवस्थित सुरु होती. त्यानंतर मात्र नोटाबंदी झाली आणि सागर इन्व्हेस्टमेंटचा डोलारा कोसळला. दोन महिने व्याज न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी तगादा लावला आणि मार्च २०१७ मध्ये समुद्र कुटुंब गायब झालं. नंतर श्रीरामच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली, पण वार्धक्यामुळे त्यांनाही जामीन मिळाला. त्यानंतरही श्रीराम आणि त्याचा परिवार फरार होता. या काळात उच्च न्यायालयानेही त्यांचा जमीन फेटाळत त्यांना तात्काळ शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. अखेर बुधवारी सायंकाळी श्रीराम समुद्र, त्याची पत्नी अनघा, भाऊ कैवल्य आणि काकू सुप्रिती यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करली.

श्रीराम समुद्रच्या अटकेमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी या सर्वांना कल्याण सत्र न्यायालयात उभं करण्यात आलं, यावेळी न्यायालयाने त्यांना १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात हा घोटाळा १६० कोटींच्या घरात असल्याचा आकडा समोर आला आहे. मात्र हा फक्त चेकने व्यवहार केलेल्या ३ हजार गुंतवणूकदारांचा आकडा असून अनेकांनी रोखीने व्यवहार केल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हा आकडा तब्बल ५०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. शिवाय शहरातील अनेक बड्या धेंडांनी यात ब्लॅक मनी ठेवल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक मोठी नावं तपासात बाहेर येण्याची शक्यता आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतात का? आणि हे पैसे घेऊन समुद्र परिवाराने नेमकं केलं तरी काय, आशा अनेक गोष्टी आता समोर येणार आहेत. त्यामुळे सर्वांचंच या खटल्याकडे लक्ष लागलं आहे.