मुंबई: स्तंभलेखिका शोभा डे यांनी ट्विट करुन केलेल्या अपमानाचा चांगलाच फायदा मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलीस अधिकारी दौलतराम जोगावत यांना झाला आहे.

कारण गेल्या वर्षी डे यांनी ट्विट केल्यानंतर जोगावत यांनी वजन कमी करण्याचं मनावर घेतलं. इतकंच नाही तर त्यांनी मुंबई गाठून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे जोगावत आता 180 किलोवरुन थेट 115 किलोवर आलेत. त्यांनी एकूण 65 किलो वजन घटवलं आहे.

इतकंच नाही तर डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी करण्याचं लक्ष्य दौलतराम जोगावत यांनी ठेवलंय.

मुफज्जल लकडावाला यांनी जोगावत यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली हे विशेष. मुंबईतील सैफी रुग्णालयात जोगावत यांच्यावर गॅस्ट्रिक बायपास प्रोसिजर झाली.

या सगळ्या प्रकारानंतर जोगावत यांनी शोभा डे यांचे आभार मानलेत. त्यांनी ट्विट केल्यामुळेच वजन कमी करण्याचा आपण गांभीर्यानं विचार केला, असं जोगावत म्हणाले.

इतकंच नाही तर आणखी 30 किलो वजन कमी केल्यावर मी शोभा डे यांना नक्की भेटेन असंही ते म्हणाले. सध्या जोगावत मध्य प्रदेशातील नीमच शहरातील कंट्रोल रुममध्ये तैनात आहेत. ते पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होतील.

पुढील दीड वर्ष जोगावत यांना लिक्वीड डाएट देण्यात येणार आहे. त्यानुसार दौलतराम यांचं वजन शंभर किलोने कमी करण्याचा प्रयत्न असेल. सोबतच त्यांचा रक्तदाब आणि मधुमेहही नियंत्रणात येणार आहे.

जोगावत यांच्यावर मोफत उपचार होणार आहेत. मध्य प्रदेश सरकारची इच्छा असल्यास, ते हा खर्च उचलू शकतात, मात्र दौलतराम यांच्याकडून एकही पैसा घेतला जाणार नसल्याचं सैफी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

खरं तर, माझं वजन माझ्या कामात कधीच अडथळा ठरलं नाही, मी कायमच अॅक्टिव्ह होतो आणि गुन्हे सोडवण्यासाठी माझा मेंदू तत्पर आहे. माझ्या कामासाठी माझा गौरवही झाला आहे, असं जोगावत म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारीला शोभा डे यांनी एक फोटो ट्वीट करुन 'हेवी पोलिस बंदोबस्त इन मुंबई टुडे' असं कॅप्शन दिलं होतं. भारदस्त दौलतराम यांचा फोटो पाहून मुंबई पोलिसांनी हा आपल्या पोलिस खात्यातील अधिकाऱ्याचा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर सोशल मीडियावर यूझर्सनी शोभा डे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

संबंधित बातम्या

मध्य प्रदेशच्या 'त्या' पोलिस अधिकाऱ्याकडून शोभा डेंचे आभार