Babanrao Gholap joined Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटात नाराज असलेले माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आज अखेर शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दोन महिन्यांपूर्वीच बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र ठाकरेंकडून कुठलेही उत्तर न आल्याने त्यांनी आज अखेर शिंदे गटाची वाट निवडली. बबनराव घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार (Sanjay Pawar) यांनीदेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 


54 वर्ष बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम केलंय - बबनराव घोलप


पक्षप्रवेशानंतर बबनराव घोलप म्हणाले की, आज माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे. मी मागची 54 वर्षे बाळासाहेब यांचा शिवसैनिक म्हणून काम केलं आहे. ठाकरे गटाकडून माझ्यावर अन्याय झाला आहे. मला संपर्कप्रमुख पदावरून काढण्यात आले. तिथे काहीतरी काळबेर झालं असं म्हणता येईल. त्यामुळे मी उपनेते पदाचा राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. 


एकनाथ शिंदेंसोबत राहणे गरजेचे - बबनराव घोलप


ते पुढे म्हणाले की, शिंदे साहेब गोरगरिबांचे काम करतात. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. मध्यंतरी मी समाजाचे काही प्रश्न मांडले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी 25 वर्षे आमदार राहिलो आहे. माझ्याकडे महाराष्ट्राची माहिती आहे. त्यामुळे मला राज्यातील जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन, असे यावेळी बबनराव घोलप यांनी सांगितले. 


बबनरावांनी कुठलीही मागणी केली नाही - एकनाथ शिंदे 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बबनराव घोलप आणि संजय पवार यांचं मी स्वागत करतो. आरपीआयचे नगरचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे हे सुद्धा शिवसेनेत दाखल झाले. वरळीमधील 100 महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांचं सुद्धा स्वागत. बबनराव यांना धन्यवाद देतो यासाठी कारण त्यांनी माझ्यासमोर कोणतीही मागणी केली नाही. ते राज्यभर आणि देशभर काम करतात. मागे सुद्धा त्यांच्यासोबत बैठक झाली. याआधी आपण अनेक निर्णय घेतले आहेत. मुंबईत 200 कोटी रुपयांचे भवन उभे राहण्याचा आपण निर्णय घेतला. 


उद्धव ठाकरेंवर टीका


बबनराव घोलपांची भावना ही समाजाला न्याय मिळवून देण्याची भावना होती. बबनराव घोलपांनी ज्या भावना व्यक्त केल्या तो अनुभव आम्हाला सगळ्यांना आला आहे, अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) नाव न घेता केली. 


थोडा आधी पक्षप्रवेश व्हायला हवा होता - एकनाथ शिंदे


चर्मकार बांधव भगिनींचा उद्धार कसा होईल याची जबाबदारी मी त्यांना देतो. चर्मकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करायचं आहे. असा कोणताही घटक नाही की सरकारने काही केलं नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्य, केंद्राने केलेलं काम आपण लोकांसमोर मांडलं आहे. काल हिंगोली, यवतमाळ येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. रामटेकमध्येही प्रचंड प्रतिसाद मिळाला. या नेत्यांचा राज्यभर फायदा होणार आहे. थोडा आधी हा पक्षप्रवेश व्हायला हवा होता पण, देर आये दुरुस्त आये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Loksabha : 'नाशिकमधून भुजबळ नव्हे तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार', शिवसेनेच्या दाव्याने महायुतीत पेच वाढणार!