(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir : 'राम मंदिराच्या नावानं चंदा हा भाजपचा धंदा', काँग्रेसचा गंभीर आरोप
राम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाचे काम जोरात सुरु आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपरुपी रावण करत आहे. राम मंदिर चंदा हा भाजपचं धंदा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
मुंबई : सध्या राम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाचे काम जोरात सुरु आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत म्हणाले की, राम मंदिर प्रक्रिया सुरू आहे. राम मंदिर निर्मितीकर्ता निधी संकलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात लोक सहभागी होत आहेत. पण ह्या कार्यक्रमात भाजप आणि RSS सहभाग चिंताजनक आहे. भाजपने राम मंदिर मुद्दा फक्त राजकारणासाठी वापरला आहे. राम मंदिर चंदा हा भाजपचं धंदा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत पुढे म्हणाले की, भाजप आणि RSSने निधी उभारताना जो पुढाकार घेतला आहे. यातून जनतेला लुबाडण्याची शक्यता आहे. भाविकांचे मेहनतीचे पैसे राम मंदिर निर्माण आणि ट्रस्टला जाईल याची जनतेने काळजी घ्यावी. रोखीने पैसे गोळा केला जातो त्यात अपहार होऊ शकतो. राज्य सरकारने राज्यातील भाविकांची लुबाडणूक होऊ नये यासाठी जो भाजपने किंवा आरएसएसने जो निधी संकलित केला असेल त्याची चौकशी व्हावी, असंही सावंत म्हणाले.
ते म्हणाले की, निर्मोही आखाडा यांनी आरोप केला होता विश्व हिंदू परिषदेने 1400 कोटी पैसे लुबाडले. अनेक क्विंटल सोने लुबाडले गेले. हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे चौकशीची मागणी केली होती. 2017 पासून चौकशी प्रलंबित आहे. 4 जानेवारी 2021 रोजी हिंदू महासभेने भाजपने निधी गोळा करू नये असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपला तिथे राम मंदिर कधीच नको होतं. गेल्या तीन दशकात भाजपने जमा केलेल्या पैशाचा हिशोब दिला नाही. राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपरुपी रावण करत आहे. हे हिंदू महासभा बोलत आहे. त्यांनी कोर्टात जायचा इशारा दिला आहे, असंही सावंत म्हणाले.
सचिन सावंत म्हणाले की, राज्य सरकारने याबाबत चौकशी करावी. भाजप नुसते होर्डिंग लावत आहे. भाजपचा हा राजकीय आणि आर्थिक अजेंडा आहे. मी स्वतः राज्य सरकारपुढे निवेदन देईन. या माध्यमातून आर्थिक गुन्हा घडला जाऊ शकतो. हे हिंदू महासभेला देखील वाटत आहे, असं ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, तो वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कुणी कुठेही जाऊ शकतं. मनसे भूमिका काय असते हे राज ठाकरेही सांगू शकत नाहीत. जे झेंडे बदलतात त्यांच्याविषयी काय बोलणार, असं सावंत म्हणाले.
अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, अण्णा यांची सहा वर्षे झोप झाली आहे. आता ते खडबडून जागे झाले आहेत. आंदोलन करणारे शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी जनलोकपाल बिलाबाबत भूमिका मांडावी मग नंतर बोलू, असं सावंत म्हणाले.