मुंबई : 'अॅक्सिस बँके'च्या सीईओ शिखा शर्मा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदावरुन पायउतार होणार आहेत. वर्षअखेरीस आपलं पद सोडण्याचा निर्णय शर्मांनी जाहीर केला आहे.


कार्यकाळ अडीच वर्षांनी कमी करण्याची विनंती करत शिखा यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अॅक्सिस बँकेच्या सीईओपदी पुन्हा एकदा शिखा शर्मा यांची नियुक्ती करण्याच्या बोर्डाच्या प्रस्तावावर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या पार्श्वभूमीवर शिखा शर्मांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

आपला तीन वर्षांचा कार्यकाळ फक्त सात महिन्यांचा करण्यात यावा, अशी मागणी शिखा यांनी केली आहे. येत्या जून महिन्यात शिखा शर्मा यांची चौथ्यांदा सीईओपदी नियुक्ती होणार होती. शिखा शर्मा 2009 पासून अॅक्सिस बँकेच्या सीईओपदाची धुरा सांभाळत आहेत. आर्थिक क्षेत्रात इतकी वर्ष सीईओपद सांभाळणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.

1 जून 2018 पासून पुढील तीन वर्षांसाठी एमडी आणि सीईओपदी शिखा शर्मांची नियुक्ती करत असल्याचं बोर्डाने 8 डिसेंबर 2017 रोजी आरबीआयला सांगितलं होतं. शिखा शर्मा यांनीच बोर्डाला आपली पुन्हा एकदा एमडी आणि सीईओपदी नियुक्ती करण्यासाठी विचार केला जावा, अशी विनंती केल्याचं अॅक्सिस बँकेने सोमवारी स्पष्ट केलं होतं.