मुंबई : एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयकृत बँक स्वतः आगारातून घेऊन जाणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या दरवर्षी रोकड हाताळणीसाठी खर्च होणाऱ्या सुमारे १३ कोटी रुपयांची बचत होणार आहे.


काही महिन्यांपूर्वी सोलापूर आगारात १५ लाख रुपयांची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेची मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेऊन रोख रक्कम भरण्याची जबाबदारी संबंधित बँकेवर सोपविण्याबाबत एसटी प्रशासनाला सूचना केली होती.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या २८४ व्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मंत्री रावते म्हणाले की, ‘एसटी महामंडळाच्या २५० आगारात तिकीट विक्रीतून गोळा झालेली रोख रक्कम दररोज बँकेत महामंडळामार्फत जमा केली जाते. दरदिवशी सुमारे १५ कोटी रुपये रोख स्वरुपात विविध आगारात जमा होतात. ही रक्कम एसटीच्या बसेसद्वारे जवळच्या स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेत भरली जाते. मात्र प्रत्येक आगारातून मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या रोख रकमेची पुरेशी सुरक्षा व्यवस्था एसटीकडे उपलब्ध नसल्याने तसेच मागणी करूनही अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस प्रशासनाकडून असमर्थता दाखवली जात असल्याने या रकमेची चोरी होणे, दरोडा पडणे अशा घटना घडत असतात. हे सर्व थांबविण्यासाठी बँकेनेच आगारात येऊन रक्कम घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार भारतीय स्टेट बँकेने राज्यातील २५० आगार क्षेत्रातील रोख रक्कम घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे ही रक्कम बँकेत जमा करणे, त्यासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था, बसची व्यवस्था या सर्वावरील खर्चात बचत झाल्याने महामंडळाचे दरवर्षी तब्बल १३ कोटी रुपये वाचणार आहेत.’ असे त्यांनी सांगितले.