मुंबईत रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 40 रिक्षा चोरल्याचं उघड
मुंबईत अंधेरी पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीच्या 40 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
मुंबई : मुंबईत अंधेरी पोलिसांनी ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीच्या एकूण 40 रिक्षा ज्याची किंमत 75 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.
अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधेरी कुर्ला रोडवर 13 मार्च रोजी रात्री एक रिक्षाचालकाने रिक्षा उभी करुन घरी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षा चालवण्यासाठी गेले असता रिक्षा त्या ठिकाणावर नव्हती. आजूबाजूला शोध घेतला, पण रिक्षा सापडली नाही. त्यामुळे त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रिक्षाचा शोध घेण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केलं. या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज आणि इतर तांत्रिक बाजू तपासल्या असता एक रिक्षा संशयितरित्या फिरत असल्याचं निदर्शनास आलं.
पोलिसांनी पाळत ठेऊन त्या रिक्षा चालकाला दिंडोशी येथे सापळा रचून अटक केली. त्याची चौकशी केली असता या रिक्षा चोरुन वसईला एका गॅरेजमध्ये नेऊन त्याचा रजिस्टर नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर बदलून त्या पुन्हा मुंबईत आणून भाड्याने देत असत. अंधेरी पोलिसांनी वसईतील गॅरेजमधून गॅस कटर, सिलेंडरसह इतर साहित्य जप्त केलं. यात मुन्नातीयाज शेख (वय 61 वर्षे राहणार पवई) आणि खुशनुयार मुख्तार शेख (वय 37 वर्षे) यांना जरीमरी कुर्ला येथून अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर आरोपांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली. तसंच चांगली कामगिरी केल्याबद्दल तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं बुके देऊन स्वागत केलं.