मुंबई : रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये दोन रुपयांनी वाढ होण्याची चिन्हं आहेत.
मुंबईतील रिक्षा-टॅक्सीच्या दरांबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) लवकरच एक बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन दरवाढीची मागणी करत आहेत.
सीएनजीच्या दरातील वाढ आणि जीवनावश्यक खर्च यानुसार भाडेवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या दोन वर्षात सीएनजीचे दर प्रतिकिलो तीन रुपयांनी वधारले आहेत. याशिवाय वाहनाचा भांडवली खर्च, वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती खर्च, इन्शुरन्स, कर या बाबींचाही विचार होईल.
रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात दोन रुपयांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे रिक्षाचे किमान भाडे 18 वरुन 20 रुपयांवर जाईल, तर टॅक्सीचं किमान भाडं 22 वरुन 24 रुपयांवर जाईल.
नॉन-पिक अवर्समध्ये 'हॅपी अवर डिस्काऊण्ट' देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. त्याचप्रमाणे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दरवाढीचा फटका बसू नये, याची काळजी घेण्याचंही ग्राहक पंचायतीने सुचवलं आहे.