नवी मुंबई : अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणातील नेमणूक केलेले नामवंत वकील प्रदीप घरत यांना नवी मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप घरत यांची नेमणूक होऊन एक महिना होऊन गेला तरी नवी मुंबई पोलिसांनी त्यांना आश्विनी बिंद्रे प्रकरणाची कोणतीच माहिती दिलेली नाही किंवा संपर्कही साधला नाही.


विशेष म्हणजे आलिबाग कोर्टात तीन केसच्या सुनावणी झाल्या असून या सुनावणीला केसचे प्रमुख तपास आधिकारी अजय कदम यांनी गैरहजर राहत आरोपींना मदत होईल अशी भूमिका घेतली असल्याचा संशय निर्माण झाला आहे. अलिबाग कोर्टानेही यावर नाराजी व्यक्त केली असून नवी मुंबई पोलिसांना या केसमध्ये रस नाही का? असा सवालही उपस्थित केला आहे.


एकीकडे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना केसची कागदपत्र न देणे आणि दुसरीकडे आलिबाग कोर्टातही हजर न राहणे या पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत या केसमधून आपण बाहेर पडण्याची भूमिका सरकारी वकील प्रदीप घरत यांनी घेतली आहे.


याबाबतचे तीव्र नाराजीचे पत्र प्रदीप घरत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना पाठवले आहे. येत्या 1 जूनपर्यंत क्राईम ब्रान्च एसीपी अजय कदम यांनी केसबाबत आपल्याला कोणतेही कागदपत्र न दिल्यास आपण या केसमधून माघार घेणार असल्याचं पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.


नवी मुंबई पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आणि केसबाबत असलेल्या उदासीनतेमुळे मला आश्विनी बिंद्रे केसमधून माघार घेण्याचा वेळ आली असल्याचे दुसरे पत्र आलिबाग न्यायालय आणि मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचंही प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.


दरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार आणि तपास अधिकारी अजय कदम आजही अश्विनी बिद्रे केसमधील आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप बिद्रे कुटुंबियांनी केला आहे. तसेच एसीपी संगीता शिंदे आल्फांन्सो यांची या प्रकरणासाठी पुन्हा प्रमुख तपास अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणीही बिद्रे कुटुंबियांनी केली आहे. आतापर्यंतच्या तपासाला संगीता शिंदे आल्फांन्सो यांनीच गती देत आरोपींना अटक केलेली होती.


प्रदीप घरत यांच्या कारकिर्दीतील महत्वाचे खटले


अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात सरकारच्या वतीनं प्रदीप घरत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर पत्रकार जे डे हत्याकांडातील आरोपी छोटा राजनला प्रदेशातून आणून शिक्षा लावली आहे.

बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या खटल्याला गती देण्याची विनंती केली होती. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर प्रकरणाचा खटला एका वर्षात निकाली काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.


काय प्रकरण आहे?


15 एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.


अश्विनी जयकुमार बिद्रे 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरिक्षक पद मिळालं.


पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.