"हीच वेळ आहे... हीच संधी आहे. लक्ष्य- विधानसभा 2019, महाराष्ट्र वाट पाहतोय आदित्य ठाकरे.." युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांच्या यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टनंतर आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
याविषयी मिलिंद नार्वेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, "निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय आदित्य ठाकरे स्वत: किंवा उद्धव ठाकरे घेतील. निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. आदित्य ठाकरे जो निर्णय घेतील त्यांचं शिवसैनिक स्वागत करतील."
संपूर्ण महाराष्ट्र आदित्य ठाकरेंचं मतदारसंघ
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास त्यांचा मतदारसंघ कोणता असेल, या प्रश्नावर मिलिंद नार्वेकर यांनी उत्तर दिलं की, "संपूर्ण महाराष्ट्रच आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल."
वरळी-शिवडी मतदारसंघाची चाचपणी
दरम्यान, आदित्य ठाकरेंसाठी काही महत्त्वाच्या मतदारसंघांची चाचपणी झाली आहे. त्यात वरळी, शिवडी या शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघांचा समावेश आहे. तर आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह देखील आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यासाठी आग्रही आहेत.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार? इन्स्टाग्रामवर पोस्टमुळे चर्चांना उधाण
आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद?
निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे सुभाष देसाईंच्या नावासाठी आग्रही आहेत, मात्र देसाईंच्या नावाच्या चर्चेमुळं शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचंही कळतं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याचा शिवसेना पक्षप्रमुखाचा विचार तर नाही ना? अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपदी विराजमान केलं, तर येणारी विधानसभा निवडणूक त्यांना लढवावी लागेल. जर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं धाडस दाखवलं नाही तर शिवसेनेला आदित्य ठाकरेंसाठी विधानपरिषदेतल्या एका आमदाराची जागा रिक्त करावी लागेल.
ठाकरे कुटुंबातील पहिलाच सदस्य निवडणूक लढवणार?
आतापर्यंत ठाकरे घराण्याने मातोश्री बंगल्यातून शिवसेनेची आणि राजकारणाची सूत्र सांभाळली आहेत. ठाकरे कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याने प्रत्यक्ष निवडणूक लढवलेली नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी पाहण्याची इच्छा, त्यांच्याभोवती असणाऱ्या शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी नेहमीच व्यक्त केली आहे. आता आदित्य ठाकरे प्रत्यक्षात निवडणुकीच्या आखाड्यात उतरुन नवीन पायंडा पाडणार का याची उत्सुकता शिवसैनिकांना आहे.