मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटाविरुद्ध आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीसही जीवाची बाजी लावून लढत आहेत. पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी आहेत. त्यातच कोरोनाची सर्वाधिक लागण पोलिसांमध्ये झालेली दिसते. या कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी खास बेत आखला होता. हा बेत म्हणजे आमरस-पुरीचा. पोलिसांनीच याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.


स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पोलिसांना छोटसं थँक्यू म्हणून आमरस पुरीचा बेत आखल्याचं अशोक सराफ यांनी सांगितलं. पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने त्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. त्यामुळे कुटुंबाच्या संपर्कात येऊ नये म्हणून अनेकांनी पोलीस स्टेशनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. या संकटात कुटुंबीयांपासून दूर आणि अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचे आभार मानण्यासाठी अशोक आणि निवेदिता सराफ यांनी त्यांना मेजवानी देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी आमरस पुरीचं जेवण दिलं. विशेष, म्हणजे निवेदिता सराफ यांनी स्वतःच्या हाताने आमरस पुरी तयार केली होती.



सराफ दाम्पत्य अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतं, हा परिसर ओशिवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. "आम्हाला पोलिसांबद्दल आदर होता. पण आता संकटाच्या परिस्थितीत त्यांचं अविरत काम पाहून तो द्विगुणित झाला आहे. सध्या आंब्याचा मोसम आहे. त्यामुळे छोटंसं थँक्यू म्हणून आम्ही पोलिसांना आमरस पुरीचा बेत आहे," असं सराफ दाम्पत्याने म्हटलं आहे.





मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढवला. त्यामुळे पुन्हा पोलिसांवरील कामाचा ताण पुन्हा वाढला आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनवणे अशी कामं करताना पोलिसांचा कोरोनाबाधितांशी थेट संपर्क येत असल्याने त्यांच्यात कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे.