मुंबई : मुंबई महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांना पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असेल. तसंच रुग्णालयाजवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यापूर्वी महापालिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तीन दिवस काम आणि एक दिवस सुट्टी देण्यात येत होती.
कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका, आरोग्य विभागातील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस अविरत काम करत आहेत. या कोरोना योद्धांसाठी आता आठवड्यातून पाच दिवस काम तर नंतरचे दोन दिवस सुट्टी अशाप्रकारचे वेळापत्रक आखले आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था रुग्णालयाजवळील करण्याचा निर्णय घेतल्याने आरोग्य विभागातील शेकडो कामगारांचा ताण कमी होणार आहे.
दरम्यान, प्रशासनिक काम करणाऱ्या किंवा सुपरव्हिजन करणाऱ्या सीनियर डॉक्टरांसाठी ही सुविधा लागू राहणार नाही, असंही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टरांना 100 टक्के उपस्थिती यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, अनेक जण लांबचा प्रवास करुन येत असल्याने दिवसाचा अर्धा वेळ प्रवासातच जायचा. त्यामुळे यापुढे डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था रुग्णालयापासून जवळच करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि मुंबई बाहेरुन येणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेल्स व्यतिरिक्त, लॉज, हॉस्टेल्स, रिकाम्या वार्डमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
कोरोनाशी लढणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना 300 रुपये दैनंदिन भत्ता, मृत कोरोनाबाधिताचे शव बांधण्यासाठी विशेष प्रोत्सहन भत्ता 500 रुपये परिपत्रकाप्रमाणे देण्यात येतो.