डोंबिवली : कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं असून यासाठी आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचं सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानं दिला होता. यानंतर या गोळ्यांची वाढलेली मागणी पाहता डोंबिवलीत गोळ्यांचा गोरखधंदा सुरू करण्यात आला होता. मात्र मनसेनं या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस आणि एफडीएनं इथे कारवाईचा बडगा उगारला.

कोरोनाशी दोन हात करायचे असतील, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं असून यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या घेण्याचा पर्याय आयुष मंत्रालयानं सुचवला होता. यानंतर या गोळ्यांना मोठी मागणी आली. मात्र या वाहत्या गंगेत हात धुवून घेणाऱ्या डोंबिवलीच्या एका होमिओपॅथिक व्यापाऱ्याला मनसैनिकांच्या जागरूकतेमुळे लगाम बसला. डोंबिवली पश्चिमेच्या सुभाष रोडवर हेमंत होमिओ फार्मसी नावाचं दुकान असून तिथे या गोळ्यांची विक्री केली जात होती. मागच्या काही दिवसात शेकडो लोकांनी या गोळ्या इथून नेल्या होत्या. मात्र या गोळ्यांची पॅकिंग कशी केली जाते, हे पाहिल्यानंतर लोकांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही.

एका छोट्याश्या गाळ्यात तीन मळक्या कपड्यातले बालकामगार कुठल्याही प्रकारची काळजी न घेता या गोळ्या उघड्या हाताने पॅक करत होते. इतकंच नव्हे, तर तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत या गोळ्यांवर आर्सेनिक औषधही टाकलं जात होतं. याचा मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारल्यानंतर दुकानदाराने फक्त सॉरी म्हणून वेळ निभावून नेली, मात्र या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आज सकाळपासून गोळ्या परत करायला गर्दी केलीये.

या सगळ्यानंतर पोलिसांनी या फार्मसी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर एफडीएनंही आज दोन ते तीन तास या फार्मसी चालकाची कसून चौकशी करत कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्याच्या गोरखधंद्याला चाप बसला आहे.

आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची मागणी वाढली, की तिचा गोरखधंदा सुरू होतो. मग ते हॅन्ड सॅनिटायझर असो, एन 95 मास्क असो, किंवा मग आता या आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या. या संकटाच्या काळात लोकांना आधाराची गरज असताना त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना धडा शिकवला गेलाच पाहिजे..!