मुंबई : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘प्रथम’ संस्थेकडून दरवर्षी ‘असर’ नामक अहवाल प्रसिद्ध केला जातो. गतवर्षाचा म्हणजे 2017 चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण, त्यांची आकडेवारी आणि विश्लेषण या अहवालात आहे. मुलं आणि मुलींच्या शिक्षणातील तुलनात्मक गोष्टीही यात मांडण्यात आल्या आहेत.
असरचा अहवाल
‘असर’ म्हणजे अॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट गेल्या 12 वर्षांपासून अहवाल प्रसिद्ध होतो. ‘असर’ने देशातील 24 राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये जाऊन शिक्षणासंदर्भातील आकडेवारी गोळा करुन विश्लेषण केले आहे. 14 ते 18 वयोगटातील 28 हजार 323 जणांपर्यंत पोहोचून ‘असर’ने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. सक्रीयता, क्षमता, जनजागृती आणि आकांक्षा अशा भागांमध्ये त्यांच्याकडून माहिती गोळा केली.
सक्रीयता
14 ते 18 वयोगटातील जवळपास 86 टक्के मुलं फॉर्मल एज्युकेशन (शाळा, महाविद्यालयातील शिक्षण) घेत आहेत.
निम्म्याहून अधिक (54 टक्क्यांपेक्षा कमी) विद्यार्थी दहावीपर्यंत पोहोचतात. त्यानंतर 25 टक्के विद्यार्थी अकरावी आणि बारावीपर्यंत, तर 6 विद्यार्थी पदवीपर्यंत. सुमारे 14 टक्के विद्यार्थी फॉर्मल एज्युकेशन घेत नाहीत.
वाढत्या वयानुसार फॉर्मल एज्युकेशनमधील मुलं आणि मुलांच्या संख्येचा पट चढ-उताराचा होत जातो. वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत मुलगा किंवा मुलगी यांच्यातील फरक फार नसतो, मात्र जसजसे वय वाढते, तसे मुलींची संख्या कमी होते.
क्षमता
14 ते 18 वयोगटातील जवळपास 25 टक्के मुलांना अद्याप मातृभाषेतील मुलभूत वाचनही करता येत नाही. निम्म्याहून अधिक जणांचा गणिताची समस्याही बिकट आहे. 43 टक्के जणांना तीन अंकी संख्येचा भागाकार जमतो. त्याचसोबत, 14 वर्षांचे केवळ 53 टक्के जणच इंग्रजीतील नेहमीची वाक्य वाचू शकतात. इंग्रजी वाक्य वाचण्याचे प्रमाण 18 वर्षांच्या मुलांमध्ये 60 टक्के आहे. म्हणजे फारशी प्रगती दिसत नाही.
विशेष म्हणजे, इंग्रजी भाषेतील प्रगती वाढत असल्याची दिसून येते. मात्र त्याचवेळी गणित विषयात निराशा आहे. त्यात प्रगतीची वाढ अपेक्षित होत नाही.
जनजागृती
14 ते 18 वयोगटातील जवळपास 73 टक्के मुलं मोबाईल फोन वापरतात. यातही मुलं आणि मुलींमधील आकडेवारीतील फरक रंजक आहे. 12 टक्के मुलं कधीच मोबाईल फोन वापरत नाहीत, तर त्याचवेळी दुसरीकडे 22 टक्के मुली मोबाईल फोन वापरतात. 14 वर्षांच्या मुलांचं मोबाईल वापरण्याचं प्रमाण 64 टक्के, तर तेच 18 वर्षांच्या मुलांमध्ये 82 टक्के आहे.
इंटरनेट आणि कॉम्प्युटर वापराबाबतही रंजक आकडेवारी आहे. 28 टक्के मुलं इंटरनेट, तर 26 टक्के मुलं कॉम्प्युटर वापरतात. त्याचवेळी 59 टक्के मुलं कधीच कॉम्प्युटर वापरत नाहीत, तर कधी 64 टक्के मुलं कधीच इंटरनेट वापरत नाहीत. यामध्ये इंटरनेट किंवा कॉम्प्युटर वापरात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे.
आकांक्षा
14 ते 18 वयोगटातील जवळफास 60 टक्के मुलांना 12 वीच्या पुढेही शिक्षण घ्यावे. ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांच्यामध्ये बारावीपर्यंत शिकण्याचे स्वप्न बाळगण्याचे प्रमाण निम्म्यावर (35 टक्के) येते.
मुलं आणि मुलींच्या स्वप्नातील आकांक्षा या विभागलेल्या दिसून येतात. म्हणजे अनेक मुलं सैन्य, पोलीस, इंजिनिअर, तर अनेक मुली शिक्षिका, नर्स अशा क्षेत्राला पसंती देतात. विशेष म्हणजे, याच वयोगटातील जवळपास 40 टक्के मुलांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आदर्श अशी व्यक्तीच नाही.
वाचा : प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा ब्लॉग : ‘असर’ अहवालातील अशास्त्रीय बाबी