मुंबई : इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. नेतन्याहू आज आग्य्रात जाऊन ताजमहलला भेट देणार आहेत. आपल्या भारत भेटीत ते मुंबईतही येणार आहेत. त्यांचा मुंबई दौरा खास आहे कारण, 2008 मधील 26/11 दहशतवादी हल्ल्यात आपले आई-वडील गमावलेला बेबी मोशेही यावेळी उपस्थित राहणार आहे.

मोशे आज सकाळीच मुंबईत दाखल झाला असून, इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं. "इथे परत आल्यानंतर मोशे फारच खूश आहे. मुंबई आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे," असं मोशेचे आजोबा विमातळावर उतरल्यावर म्हणाले.


पंतप्रधान मोदींकडून मोशेला निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या वर्षी जुलै महिन्यात इस्रायलला गेले होते तेव्हा त्यांनी या बेबी मोशेची भेट घेतली होती आणि मोशेला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर मोशेनेही मुंबईतील नरिमन हाऊस बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. नऊ वर्षांनंतर भारतात आलेला मोशे 17 जानेवारीला इस्रायलच्या पंतप्रधानांसह मुंबईत उपस्थित राहिल. तर 18 जानेवारीला मोशे पंतप्रधान मोदी, पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत छाबाड हाऊसचा दौरा करेल.

काय घडलं होतं त्या काळरात्री?



मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मोशे होल्त्झबर्ज अवघ्या दोन वर्षांचा होता. अतिरेक्यांनी ज्या छाबाड हाऊसवर हल्ला केला. त्याच इमारतीतून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक होते, मोशे आणि सँड्रा...

बेबी मोशे आपले वडील गॅव्रिएल आणि आई रिवका यांच्यासोबत होता. अतिरेकी थेट इमारतीत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. हल्ल्यात मोशे अनाथ झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मात्या-पित्यांच्या मृतदेहासमोर बसून मोशे रडत होता. पण त्याचवेळी मोशेसाठी धावून आली त्याची केअरटेकर सँड्रा.

बेबी मोशेला आपल्या छातीशी कवटाळून सँड्रा लपून बसली. पण बाहेर गोळीबाराच्या फैरी झडतच होत्या. घमासान सुरुच होतं. एनएसजी गार्ड्स दाखल झाले आणि तब्बल 24 तासांच्या थरारानंतर या दोघांची सुटका झाली.

आई-वडिलांवरच्या अंत्यसंस्कारानंतर मोशे आजी आजोबांकडे इस्रायलला गेला. सोबत मोशेला वाचवणारी सँड्राही तिथेच स्थिरावली. मोशे आता इस्रायलचा नागरिक आहे. सँड्रालाही नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे. सँड्रा अपंग मुलांसाठी काम करते. पण दर आठवड्याला ती मोशेला न चुकता भेटायला जाते. दोघेही सुखात आहेत फक्त त्या काळरात्रीच्या आठवणी मनात साठवून...