Aryan Khan Cruise Drug Case : मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज आज, बुधवारी न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान दिलं गेलं आहे. ऑपरेटिव्ह ऑर्डर मिळाल्यानंतर सतीश माने शिंदे आणि अमित देसाई यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नीतान सांब्रे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आजच्या दिवसाचं न्यायालयाचं कामकाज संपलं आहे. उद्या गुरुवारी सकाळी तातडीच्या सुनावणीसाठी वकिल प्रयत्न करणार आहेत. त्यामुले गेल्या 13 दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या आर्यनला आणखी काही दिवस आर्थर रोडमध्ये राहावं लागणार आहे. दरम्यान, उद्या गुरूवार 21 ऑक्टोबर रोजी आर्यनची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. कायद्यानं आर्यनची कोठडी आणखीन 14 दिवसांनी वाढवली जाऊ शकते. 


आर्यन खानचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टानं आज फेटाळला. आर्यनच्या वतीनं आता तातडीनं जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद होईल, त्यानंतर निकाल देण्यासाठी न्यायालय काही वेळ घेईल. हायकोर्टही या महिन्याअखेरपर्यंतच नियमित कामकाजासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर दिवाळीनिमित्त हायकोर्टाला दोन आठवड्यांची सुट्टी आहे. 


2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यनला 'कॉर्डेलिया द इम्प्रेस' नावाच्या क्रूझवरून एनसीबीने अटक केली. त्यानंतर 17 दिवस उलटून गेले पण ड्रग्ज प्रकरणात आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. शाहरुखचे कुटुंबही तणावात आहे. एनसीबीला आर्यनकडून ड्रग्ज मिळालेलं नाही, असा दावा आर्यनच्या वकिलांकडून केला जात आहे. पण एनसीबीने न्यायालयात दावा केला की आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे.


बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अंमली पदार्थांबाबत चॅट करत होता आर्यन खान
आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅट्स लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅट्समध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अमंली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीनं ज्या आरोपींचे चॅट्स सादर केले होते. त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅट्सचा समावेश आहे.  


कसा राहीला संपूर्ण घटनाक्रम -



  • 2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवर धाड

  • 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टिकालीन कोर्टाकडनं पहिली रिमांड 4 ऑक्टोबरपर्यंत

  • 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला नियमित कोर्टाकडनं मिळाली 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड

  • 7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली

  • आर्यनखानची रवानगी आर्थर रोड कारागृहात, कोरोनाकाळामुळे नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं

  • न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली

  • 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीनं त्यावर आक्षेप घेतला

  • मुख्य महानगदंडाधिकारी कोर्टाच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा एनसीबीचा दावा मान्य, जामीन फेटाळला

  • 9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्यानं कोर्ट बंद

  • 11 ऑक्टोबरला सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर

  • एनसीबीनं अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश

  • 12 ऑक्टोबर कोर्टात काहीही कारवाई नाही

  • 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीचा जोरदार विरोध

  • समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.

  • आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.

  • 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला

  • 15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद असल्यामुळे निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू - कोर्ट

  • 20 ऑक्टोबर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला