Sameer Wankhede Shahrukh Khan: मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की कोणत्याही राजकारणात माझ्या मुलाला अडकवू नका, असे आर्जव शाहरुख खानने (Shahrukh Khan) तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना केले असल्याचे व्हॉट्स अॅप चॅटिंगच्या माध्यामातून समोर आले आहे. सीबीआयने (CBI) सुरू केलेल्या कारवाई विरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. समीर वानखेडे यांनी आजच्या सुनावणीत आर्यन खानचे वडील शाहरुख खानसोबत झालेल्या व्हॉट्स अॅप चॅटिंग सादर केले. यातून अनेक गोष्टी समोर आल्यात.
क्रूझवर आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर शाहरुख खानने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबत व्हॉट्स अॅपवर संवाद साधला होता. शाहरूख खान हा समीर वानखेडे यांच्याशी 3 ऑक्टोबर पासून संपर्कात असल्याचे समोर आले. आज कोर्टात, 13 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या चॅटिंगनुसार, शाहरुख खानने समीर वानखेडेकडे आर्यन खानला या प्रकरणात अधिक न अडकवण्यासाठी आर्जव केले होते. त्यावेळी समीर वानखेडे यांनी काही जणांनी जी काही कृत्य सुरु केली आहेत, त्यामुळे हे शक्य होत नाही असे म्हटले.
शाहरूख खान आणि समीर वानखेडेंमध्ये 13 ऑक्टोबर 2021 मध्ये काय संवाद झाला?
शाहरुख खान- मी आपल्याला भीक मागतोय, थोडी दया दाखवा. - लव्ह एसआरके
एक वडील म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडतो, भीक मागतो.
समीर वानखेडे - शाहरुख, एक झोनल डिरेक्टर म्हणून नाही तर एक मित्र म्हणून तुला सध्याची स्थिती सांगण्याची इच्छा आहे. पण, काही जणांनी जी काही कृत्य सुरु केली आहेत, त्यामुळे हे शक्य होत नाहीय.
शाहरुख खान- माझा मुलाचा याच्याशी काहीही संबंध नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आर्यनकडून छोटीशी चूक झाली असेल, पण मोठा गुन्हा नक्की केलेला नाहीय, हे तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की, कोणत्याही राजकारणात माझ्या मुलाला अडकवू नका. माझ्या मुलावर इतके गंभीर आरोप लावू नका. मी एक वडील म्हणून फक्त कळकळीची विनंतीच करु शकतो. तुमचं हित साधण्यासाठी माझ्या मुलाचा वापर करु नका. त्यानं न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला देवू नका, मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडतो. आर्यनला तुरुंगात पाठवू नका, मी हात जोडतो. एक व्यक्ती म्हणून त्याचं आयुष्य संपून जाईल. तुम्ही शब्द दिला होता, की माझ्या मुलाला सुधरण्याची संधी मिळेल, पण तुम्ही त्याला अशा ठिकाणी पाठवताय, जिथं त्याचं आयुष्य उद्धवस्त होईल. कृपा करुन माझ्या मुलाला घरी पाठवा, तुम्हालाही माहिती आहे की त्याच्यासोबत जे काही घडतंय, ते चुकीचं आहे. प्लीज प्लीज, एका वडिलाची विनंती मान्य करा. माझा, तुमच्यासह व्यवस्थेवर विश्वास आहे, कृपा करुन माझ्या याच विश्वासाला तडा जावू देवू नका. माझं अख्खं कुटुंब उद्धवस्त होईल. तुमचा खूप खूप आभारी आहे - लव्ह शाहरुख खान
समीर वानखेडे- प्रिय शाहरुख, सध्याच्या घडामोडींमुळे माझं हृदय पिळवटून निघालंय. माझ्यासोबतचा प्रत्येक जण आजघडीला याच भावनिक स्थितीत आहे.
इतर संबंधित बातमी: