Sameer Wankhede:  आर्यन खान प्रकरणी अभिनेता शाहरुख खानकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआयकडून माजी NCB अधिकारी आणि IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांनी आपली बाजू मांडताना शाहरुख आणि त्यांच्यात झालेल्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट सादर केले आहेत. 


हायकोर्टात सादर करण्यात आलेले चॅट्स 3 ऑक्टोबर 2021 चे आहेत. तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील हा संवाद सकाळी 10 वाजून 37 मिनिट वाजण्याच्या सुमारास झाला आहे. 


शाहरुख खान: समीर साहेब, मी तुमच्यासोबत एक मिनिटांसाठी बोलू शकतो का? मला कल्पना आहे की, अशा प्रकारे बोलणे कदाचित पूर्णपणे चुकीचे आहे. मात्र, एका वडील म्हणून तुमच्याशी संवाद साधू शकतो का?


समीर वानखेडे: प्लीज कॉल


शाहरुख खान: फोन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? धन्यवाद


4 ऑक्टोबर 2021 


शाहरुख खान: तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेले विचार आणि वैयक्तिक माहितीसाठी मी तुमचे आभार मानू शकत नाही. तो असा व्यक्ती होईल ज्याचा तुम्हाला आणि मला दोघांनाही अभिमान वाटेल, यासाठी मी प्रयत्न करेल. ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. मी वचन देतो, चांगल्या मार्गाने या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी आमची भूमिका पार पाडली आहे आणि आता पुढच्या पिढीवर अवलंबून आहे की त्यांना भविष्यासाठी तयार करा. तुमच्या दयाळूपणा आणि समर्थनासाठी पुन्हा धन्यवाद. लव्ह SRK 


वानखेडे: माझ्या शुभेच्छा आहेत. 


शाहरुख: तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात...कृपया आज त्याच्यावर दया दाखवा..मी आपल्याला विनंती करतो...


वानखेडे: नक्कीच...Don't Worry...


शाहरुख खान:  देव तुमचं भलं करो... जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा मला फक्त सांगा... मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून मिठी मारायची आहे. तुमच्यासाठी जेव्हा जेव्हा ते सोयीचे असेल तेव्हा मला कृपया कळवा. तुमच्या कामाविषयी मला कायम आदर आहे आणि आदर राहील. बिग रिस्पेक्ट


वानखेडे: नक्कीच आपण भेटुयात...आधी हे सगळं प्रकरण संपवूयात...


काय आहे आर्यन खान प्रकरण?


एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. 


एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचा एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता.  आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती.